ठरावाला झुगारून कार्यालय इमारत मोडली, अखेर कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, तळवली तर्फे अष्टमी ग्रा. पं. त प्रकार

Share Now

613 Views

रोहा (शशिकांत मोरे) केंद्र सरकारच्या सबके साथ सबका विकास या बोध वाक्याला रोह्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायत सरपंच आणि त्यांच्या पतीने आपला मनमानी कारभार चालवीत चांगलाच ब्रेक दिला. ग्रामपंचयतीची जुनी इमारत तोडू नये व जागेवर कोणीही बांधकाम करू नये असा ग्रामपंचायतीत ठराव झाला असतानाही या ठरावाला झुगारून सरपंचांच्या प्रतापामुळे ही इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. याबाबत रोहा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली असून अखेर सरपंच व त्यांचे पती यांच्यावर कोलाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायतीत रुपाली कोस्तेकर या सरपंच म्हणून काम करीत आहेत. मात्र मागील दोन वर्षांपासून हुकूमशाही आणि स्वतःच्या मनमानी पद्धतीने ग्राम पंचायतीचा कारभार सुरू असून मागील काही महिन्यांपूर्वी गट नं.३५१ असेसमेंट नं.१११ वरील ग्राम पंचायत मालकीची असलेली जुनी इमारत कोणतीही शासकीय परवानगी अथवा कोणताही ठराव मंजूर नसताना १५ जुलै २१ रोजी पाडण्यात आली. दरम्यान ही इमारत तोडणेत येऊ नये असा अर्ज दाखल करणार आला होता,तर ३० जुलै रोजी मासिक सभेत जागेवर कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असा ठराव करण्यात आला. याबाबत सरपंच व त्यांचे पती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी लेखी तक्रार १६ सप्टे रोजी कोलाड पोलीस ठाण्यात देण्यात आली. या प्रकरणी कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र याबाबतीत संबंधित कारवाईस विलंब झाल्याने उपरपंच मानसी लोखंडे, सदस्या सरोजनी मरवडे, रिया लोखंडे, शांताराम महाडिक व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करीत नाराजीही व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीत सरपंचांनी केलेली ही पहिलीच घटना ताजी असताना पुन्हा एक नवे प्रकरण समोर आले. सन २०२०/२१या वर्षात मार्च मध्ये रोहा धाटाव औद्योगिक वसाहतीतील जागतिक स्तरावर नाव लौकीक असलेल्या एका खाजगी कंपनीने खास शाळाग्रह उभरण्याकरिता त्यांच्या सीएसआर फंडातून पाच लाखाहून अधिक रक्कमेचा धनादेश ग्राम पंचायत नावे दिला. ही रक्कम ग्रामपंचयतच्या बँक खात्यात जमा देखील झाली. परंतु सदरच्या मिळालेल्या रक्कमेतून या ग्रामपंचायत हद्दीत शाळा तर सोडाच मात्र कुठलेही ठोस विकासात्मक कामही या पैशांतून झालेले नाही. दरम्यान पंचायतीच्या खात्यात मिळालेल्या रकमेचा सरपंच पदाचा गैरवापर करीत रुपाली कोस्तेकर आणि त्यांचे पती रघुनाथ कोस्तेकर यांनी हस्तक्षेप करून स्वतःच्या मर्जीप्रमाणे आर्थिक अपहार केला असल्याचे लेखी तक्रार पत्र उपरपंच मानसी लोखंडे सदस्या सरोजीनी मरवडे, रिया लोखंडे यांनी गटविकास अधिकारी यांना २९ ऑक्टों रोजी दिले आहे.

जुनी इमारत तोडू नये या ग्रामस्थांच्या तक्रारी अर्जासह मासिक सभेत सदर जागेवर कोणतेही बांधकाम करू नये हा ठराव घेतला असताना त्याचप्रमाणे सरपंच विश्वासात घेऊन काम करीत नसल्याच्या सदस्यांच्या नाराजीमुळे केवळ हव्यासापोटी व ठेक्याच्या कामासाठीच ही इमारत तोडली असल्याची खमंग चर्चा मात्र सर्वत्र एकावयास मिळत आहे. गावच्या जबाबदार सरपंचांकडून ग्रामपंचयतीत एका मागोमाग एक होत असलेले गैर प्रकार गावाच्या विकासासाठी खरोखर लाभदायक आहेत का ? असा प्रश्न आता समोर येत आहे. दरम्यान ग्रामसेविका सौ. गवळी यांनी सदर तक्रार केली असून प्रकरणी कोलास पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गद्शनाखाली चौकशी अंती रघुनाथ कोस्तेकर याच्यावर कलम ३ व ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून समंधीतास कोलाड पोलीस ठाण्याकडून नोटीस देण्यात आली असून उद्या मंगळवार दि.२३ नोव्हे रोजी कोर्टात हजर करणार असल्याची माहिती तपासी अमलदार शिद यांनी सांगितले. आता पुढे नेमके काय होते ? याकडे संबध पंचायत राजचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *