अवैध रेती उत्खनन, कांदळवनाच्या कत्तलप्रकरणी अखेर गुन्हा दाखल, करंजवीरा ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

Share Now

980 Views

रोहा (राजेंद्र जाधव) दक्षिण खोऱ्यातील करंजवीरा (कोपरी) गावाच्या हद्दीत ऑगस्ट महिन्यात केलेल्या अवैध रेती उत्खनन व कांदळवन झाडांच्या कत्तलप्रकरणी अखेर तब्बल आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले. करंजवीरा गावाच्या हद्दीत घुसून विनापरवाना रेतीची चोरी, त्यासोबत अनेक कांदळवन झाडांची कत्तल करण्यात आली होती. बांधबंदिस्ती तोडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा धक्कादायक प्रकार समोर येताच करंजवीरा ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाले. मुंबईकर ग्रामस्थांनी याप्रकरणी आ आशिष शेलार, संबधीत वरिष्ठ यंत्रणेकडे तक्रारी केल्या आणि उशिरा का होईना स्थानिक प्रशासनाला दखल घेणे भाग पडले. सलाम रायगडने ग्रामस्थांच्या मागणीला पाठबळ दिले. त्यानंतर मुख्यत: स्थानिक प्रशासनाला खडबडून जाग आली. यातून ग्रामस्थांनी दाखल केलेल्या अर्जाच्या चौकशी अनुषंगाने प्रांताधिकारी यशवंत माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. मग अखेर रेती उत्खनन व कांदळवन कत्तलप्रकरणी रेती ठेकेदार विकास पाटील यांसह आठ जणांवर पर्यावरण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले. दरम्यान, रेती उत्खनन चोरी व कांदळवन झाडांची कत्तलप्रकरणी केलेल्या करंजवीरा ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले तर स्थानिक पत्रकारांनी मोठे पाठबळ दिले. प्रकरण उघडकीस आणले, ग्रममस्थांच्या सामुहिक प्रयत्नांचे हे यश आहे अशी प्रतिक्रीया लक्ष्मण मोरे यांनी दिली आहे.

अवैध रेती उत्खननविरोधात करंजीवीरा ग्रामस्थांच्या एल्गारची दखल अखेर प्रशासनाने घेतली. सतत बोटचेपी भूमिका घेत असलेल्या स्थानिक तहसील, प्रांत प्रशासन चांगलेच भानावर आले. रेती ठेकेदारांनी कुठलीही परवानगी न घेता थेट करंजवीरा गावाच्या हद्दीत घुसले. सक्शन पंपाचा वापर करून रेतीची चोरी केली. खाडीपट्टयातील असंख्य कांदळवन झाडांची कत्तल केली. एकमेव पिण्याच्या पाण्याच्या तलावात खारे पाणी शिरल्याची गंभीर घटना ऑगस्ट महिन्यात समोर आली होती. गावाचे स्वास्थ बिघडविणाऱ्या रेती ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सरपंच अश्विनी मोरे, रामचंद्र मोरे, बबन मोरे, लक्ष्मण मोरे, मोरेश्वर मोरे, व ग्रामस्थांनी केली. तसे निवेदन मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांसह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना दिले. त्या निवेदनाची दखल न घेतल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांच्या आंदोलनाला माध्यमांनी पाठबळ दिले. त्यानंतर पो. निरीक्षक, मंडळ अधिकारी नंतर अर्जाच्या अनुषंगाने प्रांताधिकारी यशवंतराव माने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यातून दोषी ठरवत विकास पाटील, निलेश वाजंत्री, वृक्षराज पाटील, महेंद्र गुंड, सागर हवालदार, सुरेश पाटील, अनिल पाटील, अनिल तेंडुलकर सर्व अलिबाग यांच्यावर भादवी ३७९, ३४, पर्यावरण अधिनियम १९८६ कलम १५ खान खनिज विकास विनिमय अधिनियम १९५७ चे कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

करंजवीरा गावाच्या हद्दीतून अवैध रेतीचे उत्खनन व चोरी, किनाऱ्यालगतची असंख्य कांदळवन प्रजातीची झाडे तोडून पर्यावरणाचे नुकसान केले अशी फिर्याद कांदळवन संरक्षण समितीचे अध्यक्ष, प्रांताधिकारी यशवंतराव माने यांनी केली. त्यानुसार सबंधीत आरोपींवर रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. आठ जणांवर प्रथमच अवैध रेती उत्खनन व कांदळवन कत्तल पर्यावरण नुकसान प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने रेती ठेकेदारांचे चांगलेच धाबे दणाणले. मूळात करंजवीरा ग्रामस्थांच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे. त्यात सलाम रायगडने महत्त्वाची भूमिका बजावली. आठ रेती ठेकेदारांवर गुन्हे दाखल झाल्याने आम्ही ग्रामस्थ समाधानी आहोत. आमच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. स्थानिक प्रांत, तहसील प्रशासनाला उशिरा का होईना जाग आली. अशी प्रतिक्रिया लक्ष्मण मोरे यांनी दूरध्वनीवरून दिली. दरम्यान, पर्यावरणाला हानी पोचविणाऱ्या रेती ठेकेदारांवर गुन्हा दाखल होणे ही पहिलीच घटना आहे. याआधी स्थानिक प्रशासन नेहमीच बोटचेपी भूमिका घेत, प्रशासनाच्या भूमिकेला ग्रामस्थांच्या पाठपुरावा यशातून चांगलीच चपराक बसली. आतातरी प्रांत, तहसील प्रशासन लोकांच्या तक्रारींची वेळीच दखल घेतील ? अशी अपेक्षा व्यक्त झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *