चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे अपघातग्रस्त विकास मिसाळ यांचा दुदैवी मृत्यू – राजा केणी

Share Now

311 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) पोयनाड नागोठणे रस्त्यावरील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रापासून फक्त १ की.मी. अंतरावर झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातातील अपघातग्रस्तांच्या उपचाराबाबत बेजबाबदारपणे अक्षम्य दुर्लक्ष करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार कसा चालतो हे तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वर्तनाने दाखवून दिले. यावेळी तेथे त्यांना सदर अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार न करता त्यांना सुमारे तासभर दवाखान्या बाहेरच ताटकळत वेदनेत तळमळत ठेवले तेथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा कोणत्याही कर्मचारी अथवा डॉक्टर नर्स त्या अपघातग्रस्तांकडे दुर्लक्ष करत होते.

अपघाताची बातमी समजताच त्या ठिकाणी त्वरित शिवसेना तालुका प्रमुख राजाभाई केणी हे तातडीने हजर राहून डॉक्टरांशी संपर्क साधून पुढील उपचारासाठी ऍम्ब्युलन्स मागणी केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी अरेरावीची उत्तरे देऊन ड्रायव्हर हजर नाही तसेच चावी लपवून येथे चावी सुद्धा उपलब्ध नाही असे सांगून सहकार्य केले नाही. यावेळी राजाभाई केणी यांनी हस्तक्षेप करून खाजगी ड्रायव्हर उपलब्ध करून रुग्णवाहिकेतून सदर अपघातग्रस्त रुग्णांना त्वरित अत्यावश्यक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यास मोलाची मदत केली. तेव्हा जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी विकास मिसाळ हे मृत असल्याचे घोषित केले व दुसऱ्या अपघातग्रस्त ईसमाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जे.जे.रुग्णालय मुंबई येथे हालवण्यात आले. जर चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर हजर असता आणि डॉक्टर व कर्मचा-यांनी वेळेवर उपचार केले असते तसेच १ तास व्यर्थ गेला नसता तर विकास मिसाळ यांना प्राण गमवावे लागले नसते.

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आजूबाजूला डोंगराळ व आदिवासी भाग असून येथून सुमारे २५ कि. अंतरावर जिल्हा रुग्णालय आहे. डोंगराळ भागामुळे येथे सर्पदंश, विंचू दंश अशा अनेक घटना रात्री-बेरात्री घडत असतात तसेच महिलांच्या डिलिव्हरी च्यावेळी या प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळी ५ नंतर डॉक्टर अथवा जबाबदार कर्मचारी हजर नसतात या अनुषंगाने वेळोवेळी जनतेच्या तक्रारी होऊन ही संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे येथील जिल्हा परिषद सदस्या व काही राजकीय पक्षांचे नेते येथील कर्मचाऱ्यांचा आरोग्य सेवेपेक्षा पक्षसेवा करण्यासाठी वापर करत असतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांचा आपल्याला राजकीय आशिर्वाद असल्याचा गोड समज झाल्यामुळे येथे येत असलेल्या रुग्णांसोबत ते मुजोर पणे वागत आसून आलेल्या रुग्णांच्या जिवाशी खेळ करत आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कर्यकारी अधिकार्‍यांकडे संबंधित बेजबाबदार कर्मचाऱ्यांना योग्य शासन होऊन त्यांना निलंबित करावे अशी जोरदार मागणी जनतेत होत आहे. येथील कर्मचारी काही राजकीय पुढाऱ्यांच्या व जिल्हा परिषद सदस्यांच्या पाठबळामुळे जनतेच्या जीवाशी खेळत आहेत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचारी व डॉक्टरांची वेळीच चौकशी करून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकण्यात येईल. असा इशारा शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजाभाई केणी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *