अखेर राजा केणी यांच्या आंदोलनासमोर आरोग्य प्रशासन नमले, चिखली प्रा. आरोग्य केंद्राच्या तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या, लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

Share Now

339 Views

अलिबाग,(अमूलकुमार जैन) उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली टाळे ठोकण्यासाठी आलेल्या शिवसैनिकांसमोर आरोग्य विभाग नमले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या लेखी बदली आदेशानंतर आणि 24 तास हे केंद्र उपचारासाठी खुले राहिल अशा आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पोयनाड पोलिसांचा फौजफाटा सकाळपासूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होता. या बंदोबस्ताला न जुमानता आलेल्या शिवसैनिकांनी आरोग्य केंद्राला धडक दिली. अखेर पोयनाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक यांच्या मध्यस्थीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत घासे यांनी कारवाईचे लेखी पत्र राजा केणी यांना दिल्यानंतर टाळे ठोकण्याचे आंदोलन मागे घेण्यात आले.
आजच्या आंदोलनाने डॉ. औदुंबर कोळी यांची सुडकोली प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली आहे, त्यांच्या जागेवर डॉ. रोशन पाटील यांना चिखली प्रा. आरोग्य केंद्रात नेमण्यात आले आहे. कंत्राटी वाहन चालक अमोल म्हात्रे यांची बदली जांभुळपाडा आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. तर आरोग्य सेविका सुनिता पाटील-गावंड यांची बदली पोयनाड येथे करण्यात आली आहे. चांगली आरोग्य सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल, असेही आश्वासन नव्याने आलेल्या कर्मचाऱ्यांना राजा केणी यांनी दिले आहे.

मंगळवार (ता. 14) सकाळपासून चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात पोलीस तैनात होते. 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या अपघातानंतर उपचार न मिळाल्याने विकास मिसाळ यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्यांवर जोपर्यंत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाही, तोपर्यंत शिवसैनिक गप्प बसणार नाही असा इशारा शिवसेना अलिबाग तालुकाप्रमुख राजा केणी यांनी दिला होता. 14 डिसेंबर रोजी आरोग्य केंद्राला टाळे ठोकून कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्याचीही जय्यत तयारी करण्यात आली होती.

तालुक्यातील हजारो शिवसैनिकांसह अलिबाग मुरुड विधानसभा संघटक सतिष पाटील, कुसुंबळे सरपंच मिना लोभी, उपसरपंच रसिका केणी, ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील, जीवन पाटील, प्रमोद पाटील, योगेश जुईकर, अरविंद पाटील, शैलेश पाटील, महेश वावेकर, मन्मय पाटील, जागृती पाटील, अर्चना पाटील, तुषार शेरमकर, संकेत पाटील, अविनाश पाटील, नविन शिर्के, अक्षय पाटील उपस्थित होते. आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आलेल्या नागरिकांनी राजा केणी यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *