वरसेतील नव्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रचंड त्रुटी, ठेकेदार कमालीचा ‘निर्धास्त’, अखेरचे बिल अदा करणार नाही; गांगुर्डे

Share Now

529 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहरात तब्बल पाचसहा दिवस पाणीबाणी प्रसंग ओढावले. त्यातून नगरपरिषद प्रशासनाचा नाकर्तेपणा उघड झाला हे भयान वास्तव असतानाच जिल्ह्यातील बहुचर्चित वरसे ग्रामपंचायतीत पाणी योजना कशा राबविल्या जातात ? हे पुन्हा एकदा समोर आले आहे. अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्चाच्या नव्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामात प्रचंड त्रुटी, कामे अर्धवट असल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. इस्टीमेंटप्रमाणे कामे दर्जेदार झाली नाहीत, अजून अनेक ठिकाणी जलवाहिनी फिरवणे बाकी आहे, निवी मध्यान्ह व इतरत्र ठिकाणी जाणाऱ्या वाहिन्या जमिनीत सुरक्षीत गाडल्या नाहीत, जल वाहिन्यावर काँक्रीटीकरण नाही, रस्त्याच्या कडेलाच फुटभर मातीत जलवाहिन्या गाडल्याने फुटण्याचा धोका कायम ठेवला, अशा विविध तक्रारींकडे रोहा पाणीपुरवठा विभाग अभियंता लक्ष देत नाहीत. त्यामुळे भविष्यात पाणी पुरवठा योजनेचे तीनतेरा वाजणार ? असे नागरिकांतून बोलले जात आहे. दरम्यान, संबंधीत ठेकेदार कमालीचा निर्धीस्त असल्याचे वारंवार सिद्ध झाले, ठेकेदाराला पाठीशी घालतो कोण ? असा सवाल यातून उपस्थित झाला, तर ठेकेदार खुद्द आमचेही कॉल उचलत नाही, आम्हीच धास्तावला आहोत. कामात त्रुटी आहेत, काही कामे अर्धवट आहेत, त्यामुळे ठेकेदाराचे अखेरचे बील अदा करता येणारच नाही, असे स्पष्टीकरण उपअभियंता युवराज गांगुर्डे यांनी दिल्याने पाणी योजनेच्या कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज व्यक्त झाली आहे.

वरसे ग्रामपंचायतीवर सर्वच तटकरेंची विशेष मेहरनजर राहिली. पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या विधानसभा मतदारसंघ समावेश वरसे ग्रामपंचायतीसाठी करोडोंची विकासकामे मंजूर झाली. खा. सुनिल तटकरेंनी वर्षानुवर्षे वरसेला प्राधान्य दिले. मात्र करोडो रुपये खर्चिक योजना समाधानकारक मार्गी लागल्या नाहीत, हे माध्यमांनी नेहमीच समोर आणले. अंतर्गत नीटनेटके रस्ते नाहीत, काही विभागात पाणीपुरवठा मुबलक होत नाही. काही बिल्डर्सना अधिक मुभा दिल्याने पुरासारखा प्रश्न गंभीर बनला. सातमुशीसारख्या नाल्याला निमुळता केल्याचा फटका गणेश नगरला बसत आहे. दुसरीकडे आधीची पाणी पुरवठा योजनाही त्रासदायक ठरली. रस्त्याच्या कडेलाच मुख्य जलवाहिनी टाकल्याच्या फटका नागरिकांना बसत आहे, त्याच वादात तत्कालीन ग्रामसेवकाला ग्रामपंचायत सोडावी लागली. खुद्द ग्रामसेवकच इंजिनिअर झाल्याने काय होते ? याची आठवण नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामातील त्रुटीवरून येत आहे. एचडीपीई पाईप काही ठिकाणी अद्याप फिरविण्यात आले नाही, फिरविलेल्या पाईपांवर संरक्षीत काँक्रीटीकरण नाही, याबाबत अभियंता गांगुर्डे यांना विचारले असता सर्वच कामे पूर्ण करून घेतले जाईल, कामात त्रुटी आहेत हे विचारताच गांगुर्डे यांनी ठेकेदार यांच्याकडे बोट दाखविल्याने आश्चर्य व्यक्त झाले आहे.

वरसेतील नव्या ग्रामीण पाणी पुरवठा कामात प्रचंड त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले. कामात संबंधीत ठेकेदार गांभीर्याने लक्ष देत नाही. त्यामुळे योजनेच्या दर्जावर नव्याने सवाल उपस्थित झाला. उपअभियंता गांगुर्डे यांना विचारणा केली असता ठेकेदार खुद्द माझेही कॉल उचलत नाहीत, आम्ही हैराण झालोत, तरीही कामे पूर्ण करू कामांत त्रुटी दिसल्यास उर्वरीत बिल देता येणार नाही, अशी गांगुर्डे यांनी स्पष्ट ग्वाही दिली. तर उर्वरीत कामे सुरू आहेत, त्रुटी असतील तर संबंधीत ठेकेदाराला जाब विचारले जाईल अशी प्रतिक्रिया सरपंच नरेश पाटील यांनी दिली. मुख्यतः योजना कामात निवी यांसह अन्य वस्तीला न्याय देण्यात आलेले नाही. निवी मध्यान्ह गेलेली लाइन रस्ता कडेलाच एक अर्धा फुटात गाडण्यात आली. त्यामुळे लाइन व रहदारीचा धोका कायम आहे. याकडे नियंत्रीत अभियंता यांनीही तांत्रिकदृष्ट्या फारसे लक्ष दिलेले दिसत नाही, असे नागरिकांनी सांगितले. योजनेच्या कामाकडे लक्ष घालून त्रुटी दुरुस्त कराव्यात सबंधीत ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नयेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. अशात विभागीय उपअभियंता युवराज गांगुर्डे तक्रारींची दखल घेत योजनेच्या दर्जेदार कामाकडे
कितपत लक्ष घालतात, बिल अदा करणार नाहीत ना, त्यावर सामाजिक कार्यकर्ते काय उठाव करतात ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *