जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर , उद्यापासून सुरू होणार लसीकरण मोहीम

Share Now

218 Views

अलिबाग (प्रतिनिधी) मुंबई महानगर क्षेत्रात करोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्या सोमवार दि.3 जानेवारी पासून 15 ते 18 या वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरूवात होत असून यासाठी जिल्ह्यातील संपूर्ण आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले आहे. रायगड जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष या वयोगटातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देवून स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाचेही करोनापासून संरक्षण करण्याची जबाबदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी केले आहे.

पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय (अलिबाग, चौक, जेएनपीटी/उरण, कर्जत, कशेळे, खोपोली, महाड, म्हसळा, माणगाव, मुरुड, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन) अशी 14 आरोग्य केंद्रे आणि महानगरपालिका क्षेत्रातील 10 नागरी आरोग्य केंद्रे येथील लसीकरण केंद्रांवर ही लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यात 15 ते 18 या वयोगटातील मुलामुलींची अंदाजित संख्या 1 लाख 45 हजार 383 इतकी आहे. या सर्वांना को-वॅक्सिन लस देण्यात येणार आहे. या लसीकरण केंद्रावर सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी कोविन संकेतस्थळावर दि.1 जानेवारी 2022 पासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

*15 ते 18 वर्षे वयोगटातील नवीन लाभार्थींसाठी सूचना:-*

●सन 2007 वा त्यापूर्वी जन्म वर्ष असलेले लाभार्थी हे पात्र राहतील.
● लाभार्थ्यांना कोविन सिस्टिमवर स्वतःच्या मोबाईल नंबरद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करता येईल.
●ही ऑनलाईन सुविधा दि.1 जानेवारी 2022 पासून सुरु होईल.
● लसीकरण केंद्राच्या ठिकाणी (on-site) जाऊन नोंदणी करण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *