रोहयात नवयुवक ‘ लसवंत ‘होण्यास उत्साही, कॉर्पोरेट वशिलेबाजी, उन्हाच्या झळा सोसत सर्वसामान्य रांगेत

Share Now

240 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरातील १५ ते १८ वर्षीय नवयुवक आजपासून त्यांच्यासाठी सुरु करण्यात आलेली कोरोना प्रतिबंधक लस घेत ‘लसवंत’ होण्यासाठी उत्साही असल्याचे लसीकरण केंद्रावर दिसून आले. सकाळी ऑनलाईन नोंदणी करत ९ वा. पासून हे सर्व नवयुवक आपापल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्याने शहर सभागृहातील मिनी हॉलच्या लसीकरण केंद्रावर जमु लागले. मात्र या वेळीही रोहामधील लसीकरण वशिलेबाजी परंपरा धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मुलांना लस घेताना राखलेली पहायला मिळाली.

कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालय व अन्य ठिकाणी आपला सीएसआर निधी देण्याचा पुरेपूर फायदा या लसिकरणात आपल्या पाल्यांना विनासायास लस घेत या अधिकारी घेतला. मात्र यामुळे सकाळ पासून शिस्तीने रांगेत उभे असलेल्या सर्वसामान्यांच्या मुलाना मात्र तासनतास उन्हाचे चटके सोसत आपला नंबर येण्याची वाट पहावी लागली. जे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत, निदान त्यांचे समोर तरी समानतेचा आदर्श प्रशासनाने ठेवावा असेच आजच्या येथील एकूण परिस्थिती वरुन वाटते व यापुढे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य हे तत्व अंगिकारत नवयुवकांचे लसीकरण रोहा मधील नेहमीच जागृत असलेल्या प्रशासनाने करावे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या भारतातील १०० कोटिंच्यावर नागरिकांनी त्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले. आता यामध्ये लहान मुलांना लसीकरण कधी होणार याची प्रतिक्षा पालकवर्गासह सगळ्यांनाच होती. ती प्रतिक्षा संपून ३ जानेवारी पासून १५ ते १८ वर्षे वयोगटाचे लसीकरण सुरु झाले. आज रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या शहर सभागृह येथील लसीकरण केंद्रावर १०० ऑनलाईन व १०० ऑफलाईन या पद्धतीने नवयुवकांचे लसीकरण सुरु झाले.यामध्ये कोव्हॅक्सीन या लसीचा पहिला डोस देण्यात आला. साधारण १० ते १२ वी या शालेय माध्यमातील विद्यार्थी या लसीकरणास पात्र ठरत आहेत. आपापल्या मोबाईल मध्ये अथवा पालक, मित्र यांचे मोबाईलमध्ये आपली नोंदणी करत हे विद्यार्थी लसीकरण केंद्रावर उत्साहाने आलेले पहायला मिळत होते.

या ठिकाणी बाहेर कुठेही सावली नसल्यामुळे भर उन्हात रांगा लावत हे नवयुवक थांबलेले पहायला मिळत होते. यासोबतच लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था करण्याची तसदीही रोहा मधील आरोग्य विभागाने घेतलेली दिसून आली नाही. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची मुले विना रांग, विनासायास येत आपली लस घेत होती. मात्र सकाळपासून रांगेत असणारे सर्वसामान्य विद्यार्थी मात्र उन्हातान्हात आपला नंबर कधी लागेल याचीच कोणताही उत्साह कमी न होता वाट पहात असल्याचे पहायला मिळत होते.
एकूण जिल्हा प्रशासनाने शाळा निहाय लसीकरण करण्याचे नियोजन लवकरच करावे. व जोपर्यंत हे नियोजन होत नाही तोपर्यंत केंद्रावर सर्व सुविधा देत विना वशिलेबाजी लसीकरण करावे असे सर्व सामान्य पालकांचे मधून बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *