अलिबाग (अमूलकुमार जैन) जिल्ह्यातील ग्रामपंचायती च्या पोटनिवडणूका नुकत्याच पार पडल्या. यादरम्यान मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांनीच घोळ घातला असल्याचा आरोप ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनी केला आहे. इच्छुक उमेदवारांना खोटे दाखले ग्रामसेवकांनी दिले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर यावरून ग्रामसेवकांवर पदाचा गैरवापर केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रुप ग्राम पंचायत उसरोली पोटनिवडणूक मधिल खारदोडकुले प्रभाग क्रमांक ५ मध्ये महिला सदस्याच्या निवडणूकीकरीता इच्छुक उमेदवारांचे अर्ज म्हणून विभागामधून समृध्दी प्रशांत पाटील रा. वाळवटी, अश्विनी नितेश पाटील रा. आढाड, सुनिता संतोष मांढाडकर रा खारदोडकुले व राजश्री मनिष नांदगांवकर रा. वाळवटी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे दाखल केले होते. यामधिल समृध्दी प्रशांत पाटील यांनी त्यांचे पती प्रशांत सदानंद पाटील यांचे नावे असलेले मौजे वाळवटी घर क्रमांक ४१६ व सासरे सदानंद महादेव पाटील यांचे नावे असलेले मौजे वाळवटी घर क्रमांक २२० अ ची घरपट्टी आज रोजी पर्यत कार्यालयामध्ये जमा केलेली नाही व तसे पुरावे देखिल कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. असे असताना ग्रुप ग्राम पंचायत उसरोली मधिल ग्रामविकास अधिकारी मधुकर हरी भालदार यांनी ३ ते ४ वर्षातील घरपटटी जमा करून न घेता थकबाकी नसल्याचा खोटा दाखला दिला आहे. तसेच अश्विनी नितेश पाटील यांचे पती नितेश महादेव पाटील यांचे नावे असलेले मौजे आदाड येथिल घर क्रमांक २१८. २१९ व ११३ वी ४ वर्षाची घरपटटी जमा करून न घेता थकबाकी नसल्याचा खोटा दाखला दिलेला आहे.
या दाखल्याच्या आधारे या दोन्ही उमेदवारांचा निवडणूक अर्ज वैध ठरविण्यात आलेला आहे. मुळात हा दाखल वैध नाही. तसेव ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशी केली असता माझे असे निदर्शनास आले की, ग्रुप ग्राम पंचायत उसरोली कार्यालयामधिल कर बुकाचा वापर न करता ग्रामपंचायत एकदराचे दुसरा चार्ज असल्याचा गैरफायदा घेवून ग्रामपंचायत एकदरा कार्यालयातील बुक वापरून खोटया पावत्या तयार करून त्याच्या आधारे खोटे दाखले तयार करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्याकरीता ग्रामविकास अधिकारी यांनी सहकार्य केल्याचे दिसते आहे. दुस-या ग्राम पंचातीचे बुक वापरून ग्राम पंचायत उसरोलीचा कर वसुल करून सदरील पैसे स्वत: जवळ ठेवून पैशाचा गैरवापर केला आहे. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी मधुकर हरी भालदार यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा आरोप उसरोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेशकुमार नाना पाटील यांनी केला आहे. तर सदर प्रकारची चौकशी करत ग्रामसेवक भालकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील पाटील यांनी पंचायत समिती कार्यालयात केली आहे. तसेच या प्रकारात न्याय न मिळाल्यास प्रसंगी उपोषण, आंदोलन आदी भूमिका घ्यायला मागेपुढे पाहणार नसल्याची माहिती देखील पाटील यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.