सबंध महाराष्ट्राला हेवा वाटेल असा उच्च प्रतीचे भव्यदिव्य डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृह रोह्यात उभारणार : खा. सुनील तटकरे

Share Now

219 Views

रोहा (प्रतिनिधी) रोह्यात नवनवीन विकासकामे मागील चार पाच वर्षात झाली. महाराष्ट्र राज्य नाट्य संमेलन रोह्यात पार पडले होते. मात्र रोह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता विविध सोईसुविधा असणे तितकेच महत्वाचे आहे. सन 1987 साली डॉ. सि. डी. देशमुख यांच्या नावाने रोह्यात नाट्यगृह उभारण्यात आले. सुरुवातीला 12 ते 13 वर्ष ही वास्तू वापरात आली नव्हती. त्यानंतरच्या कालावधीत ही वास्तू वापरात आली. त्यानंतरच्या कालावधीत आपण या वास्तूचा पुरेपूर वापर केला.मात्र या वास्तूच्या खालच्या भागात पावसाळ्यात पाणी साचत असल्याने स्टेजच्या खालचा पाया जीर्ण होत गेला. यामुळे ही वास्तू वापरात येत नव्हती. यावर खा. सुनिल तटकरे यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडील वैशिष्ट्यपुर्ण योजणे अंतर्गत 20 कोटी निधी मंजूर करून घेतला.या रकमेपैकी 5 कोटी निधी रोहा नगरपरिषदेकडे वर्ग झाल्याची माहिती सांगत खा. सुनील तटकरे यांनी सबंध महाराष्ट्राला हेवा वाटेल असा उच्च प्रतीचे भव्यदिव्य डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृह रोह्यात उभारणार असल्याचे सांगितले.

गुरुवारी 27 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह रोहा येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी आ. अनिकेत तटकरे, रोहा नगरपरीषद प्रशासक मुख्याधिकारी दयानंद गोरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, स्नेहा अंबरे, महेश कोल्हटकर, राजू जैन, महेंद्र दिवेकर, पं. समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष दिवेश जैन, रियाज शेटे, कादिर रोगे, स्वाध्याय परिवाराचे मकरंद बारटक्के, नाट्यप्रेमी स्वप्नील धनावडे, प्रशांत जाधव आदींसह सभागृह विकासासाठी मुद्दे उपस्थित करणारे तज्ञ अभ्यासक उपस्थित होते.

यापुढे बोलताना खा. सुनील तटकरे म्हणाले कि, रोहा अष्टमी नगरपरीषदेकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय लोणेरे येथे पत्रव्यवहार करण्यात आला होता. यावर तांत्रिक तज्ञांनी 21 मे 2021 रोजी स्थळपाहणी केली. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे यांचा संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल 9 जून 2021 रोजी सादर करण्यात आला. या अहवालात इमारत नादुरुस्थ होऊन सार्वजनिक प्रयोजनार्थ वापर करण्यास अयोग्य असल्याचे सांगण्यात आले. यावर नगरपरीषद तत्कालीन मुख्याधिकारी व नागराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृह उभारण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानुसार आठशे सासनव्यवस्था असलेल्या व वातानुकूलित डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृहाची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. याच सभागृहात डॉ. सि. डी. देशमुख स्मारक उभारले जाणार आहे. त्याचप्रमाणे अभिनय करणाऱ्या कलाकारांना मेकअप साठी स्वतंत्र व्यवस्था, वेटिंग रूम आणि एम. पी.एस. सी व यु. पी. एस. सी व इतर स्पर्धा परीक्षा यासाठी लागणारी पुस्तके उपलब्ध असणारी लायब्ररी उपलब्ध असणार आहे.

रोहा अष्टमी नगरपरिषदचे हे डॉ. सि. डी. देशमुख शहर सभागृह अतीउच्च म्हणजे ‘क’ वर्ग नागरपरिषदेतील महाराष्ट्रात नंबर एक वातानुकूलित सभागृह उभे राहील. यासाठी मोठ्या आर्किटेक्चरची नियुक्ती केली असून त्यांनी अनेक मोठ्या वास्तूची रचना केली आहे. त्यामुळे डॉ. सि. डी. देशमुख यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या या शहर सभागृहामुळे रोहेकर नाट्यप्रेमी व रोहेकरांना नवी प्रेरणा मिळणार आहे. जुनी इमारत वापरास योग्य नसल्याने ती तोडण्याचा ठराव झाला असून लवकरच या इमारतीचा स्क्रॅब काढण्यासाठी निविदा काढणार असल्याची माहिती खा. सुनील तटकरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *