रोहा शहरातील त्या ‘धोकादायक’ वळण रस्त्याची पोलीस निरीक्षकांकडुन पाहणी

Share Now

743 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रोहा शहरातील सुप्रसिद्ध व एतिहासिक वारसा म्हणून ओळख असणाऱ्या मेहेंदळे वाड्याच्या जागी आता टोलेजंग टॉवर उभा राहिला आहे.खाजगी विकासकाने काम करताना प्रशासनाचे भरभरून ‘आशीर्वाद’ व सत्ताधाऱ्यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे मनमानी पणे काम केल्याचे वारंवार समोर आले आहे.भाजपा नेते संजय कोनकर,शिवसेना शहर प्रमुख दिपक तेंडुलकर यांनी यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करत मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई न.प.प्रशासनाने करण्यात स्वारस्य दाखविले नाही. येथील संभाव्य अपघाताचा धोका ओळखून रोहा पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी प्रत्यक्ष जागेवर येत पाहणी करण्याची विनंती रोहेकरांचे वतीने त्यांना उभय नेतेगणांनी केली होती. त्यानुसार सोमवारी राम मारुती चौकात शिवजयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन केल्यानंतर पोलीस निरिक्षकांनी काकासाहेब गांगल मार्ग व भाटे वाचनालयाकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांची पाहणी करत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या दोन्ही रस्त्यांच्या बाजूला विकासकाने नागरिक व वाहन चालकांना गैरसोयीचे व धोकादायक बांधकाम केले असल्याचे दिसत असून यासंबंधी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेजवळ चर्चा करत यावर सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई करण्यास सांगतो असे आश्वासन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी दिले आहे. आता यावर झोपेचे सोंग घेतलेले नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रोहा शहरातील काकासाहेब गांगल या प्रमुख मार्गावर असलेल्या मेहेंदळे वाडा या ठिकाणी खाजगी विकासकाने टोलेजंग टॉवर उभारला आहे. याच्या बाजुनेच जाण्याऱ्या नैसर्गिक नाल्यावर असलेला संवरक्षण कठडा सर्व प्रथम या विकासकाने जमिनदोस्त केला त्यानंतर या संपूर्ण नाल्यावर बांधकाम करत नाला पूर्णपणे बंद केला.यावर रोहा सिटिझन फोरम सह भाजपा, सेनेने वेळोवेळी आवाज उठवत नगरपरिषद प्रशासनाकडे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाईची मागणी केली. मात्र रोहा नगरपरिषदेच्या मस्तवाल प्रशासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले.या ठिकाणी विकासकाने नागरिकांचे रहदारीच्या रस्त्यावर केलेले बांधकाम व यावर उभारलेले लोखंडी पोल हे वाहनचालक व पादचाऱ्यांना धोकादायक ठरत आहेत. या मार्गावरून नेहमीच विद्यार्थी,कामगार वाहक गाड्यांसह सर्व प्रकारची मोठ्या वाहनांची वर्दळ असते. मात्र या बांधकामा मुळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेत येथून मार्गक्रमण करावे लागते.नगरपरिषद प्रशासन नागरिकांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने याकडे नेहमीच डोळेझाक करत असल्यामुळे रोहाचे कर्तव्यदक्ष निरीक्षक संजय पाटील यांना संभाव्य अपघाताचा धोका ओळखत आपण याकडे लक्ष घालावे अशी विनंती सेना भाजपा नेत्यांनी केली.नाला व रस्त्यावरील बांधकाम, त्यावर उभारलेले पोल व ठेवलेली मोठमोठी दगडे ही सर्वांच्याच दृष्टीने धोकादायक आहेत.यासंबधी रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेशी चर्चा करत वाहनचालक व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यास सांगणार असे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *