सुदर्शन कंपनीत पिग्गमेंट स्क्रॅपला भीषण आग, ग्रामस्थांना वायूची बाधा, सुदर्शनमध्ये चाललंय काय ?

Share Now

1,664 Views

रोहा (प्रतिनिधी) धाटाव एमआयडीसीतील प्रख्यात सुदर्शन कंपनीत मंगळवारी रात्रौ विषारी पिग्गमेंट स्क्रॅपला अचानक आग लागण्याची घटना घडली. पिगमेंटच्या आगीने सारा परिसर अक्षरशः काळाकुट्ट झाला. धुरातील जाड काजळीच्या विषारी वायूने शेजारील बारसोली यांसह अन्य गावातील ग्रामस्थांना घेरले दुषित वायूने अनेकांना खोकला, उलटी, श्वसनाचा त्रास झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यातील दोन बाधीत ग्रामस्थांना तातडीने रोहा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर ग्रामस्थ राजेंद्र ठाकूर या तरुणावर बुधवारी उशिरापर्यंत डॉ. वैरागी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सुदर्शन कंपनीत चाललंय काय ? मागील महिनाभरात अपघाताच्या तीन घटना घडल्या. गंभीर जमखी झालेल्या एका कामगारावर पुणे येथे उपचार सुरु आहे. दुसऱ्या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला. तर मंगळवारीच दुपारी गटारात पडून एका कामगाराचा गंभीर जखमी झाल्याचे कंपनीने सांगितले. त्याच रात्रौ विषारी पिग्गमेंट स्क्रॅपला आग लागण्याची दुर्घटना घडली. त्यामुळे फॅक्टरी प्रशासन यांसह स्थानिक प्रशासन सुदर्शनाच्या दुर्घटनांकडे का दुर्लक्ष करतो ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

धाटाव एमआयडीसीतील वादादीत सुदर्शन कंपनीत वारंवार अपघाताच्या दुर्घटना घडत आहेत. मागील महिन्यात आर.आर. कन्स्ट्रक्शनचा कामगार पडून गंभीर जखमी झाला. त्यापाठोपाठ एका स्थानिक कामगाराला त्रास झाल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान कामगाराचा मृत्यू झाला. त्या मृत्युमुखी कामगाराच्या कुटुंबियांना राजकीय दबावाखाली भरघोस मदत घेऊन प्रकरण मिटविण्यात आले होते. हे सर्व प्रकरण ताजे असतानाच मंगळवारी दुपारी विजेचे काम करताना एक कामगार पडला. त्यात तो गंभीर जखमी झल्याने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच मंगळवारी रात्रौ दहाच्या सुमारास अडगळीतील पिगमेंट स्क्रॅपला अचानक आग लागली. त्या राहीने एकच हाहाकार उडाला. धुराच्या जाड काजळीने अख्खा परिसर काळाकुट्ट झाला. दुसरीकडे काजळीतील कार्बनच्या वासाने बारसोली यांसह शेजारील गावाच्या ग्रामस्थांना मळमळ, खोकला, श्वसनाचा त्रास सुरु झाल्याचे धक्कादायकपणे समोर आले. त्यातील दोघांना अधिक त्रास झाल्याने उपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले अशी माहिती खुद्द कंपनीने दिली.

सुदर्शन कंपनीत चाललंय काय ? सतत दुर्घटना घडत आहेत. याकडे फॅक्टरी प्रशासन, एमपीसीबी यांसह प्रांत, तहसील प्रशासन गांभीर्याने लक्ष घालून कारवाई का करीत नाहीत ? असा सवाल कामगार व नागरिकांतून उपस्थित होत आहे. याउलट पिगमेंट स्क्रॅपची आग शॉर्ट सर्किटने झाल्याचा अंदाज वरिष्ठ अधिकारी बी.एन.कदम यांनी व्यक्त केला. दोनतीन दुर्घटना घडल्या अशा दुर्घटना घडू नयेत यांची दक्षता आम्ही घेणार आहोत, आगीचे स्वरूप फारसे नव्हते. आग तातडीने आटोक्यात आणली यामुळे शिस्त लावली जाईल अशी सावध प्रतिक्रिया कदम यांनी दिली. सुदर्शन कंपनीत आगीची दुर्घटना घडली. त्या घटनेची पाहणी करून त्याबाबत अधिक तपशील देतो. कारवाईची माहिती देतो असे दूरध्वनीवर फॅक्टरी अधिकारी मोहिते यांनी टाइम्सला सांगितले. तर बारसोलीचे ग्रामस्थ रोहिदास पाशिलकर यांनी प्रतिक्रिया देण्यास विनम्र नकार दिला. त्यामागे नेमके कारण काय ? हे समजू शकले नाही. तरीही सुदर्शनच्या वाढत्या दुर्घटनांनी कामगार व ग्रामस्थांच्या सुरक्षेवर पुन्हा नव्याने प्रश्न निर्माण झाले. दुर्घटनांच्या चर्चेत आलेले सुदर्शन प्रशासन आतातरी भानावर येतो का, तर संबधीत प्रशासन दुर्घटनेबद्दल सुदर्शन कंपनीवर काय कारवाई करतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *