रायगडच्या भूमीपुत्रांचा मराठी चित्रपट विश्वात बोलबाला “हरिओम” मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, महाराष्ट्रातून मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

Share Now

262 Views

मुरुड ( संतोष हिरवे ) छ. संभाजी राजे यांच्या हस्ते ‘हरिओम’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण. छत्रपतींचे निष्ठावंत मावळे म्हणून तानाजी व सूर्याजी हे दोघे भाऊ कायम स्वराज्य रक्षणासाठी प्राणपणाने लढत राहिले. शूरवीर तानाजी धारातीर्थी पडल्यावर सुर्याजीने युद्धभूमी सांभाळली. याच इतिहासाची व बंधुप्रेमाची पुनरावृत्ती करणारा संदेश हरिओम चित्रपटातून देण्यात आलाय. अन्याय अत्याचारावर प्रहार, भ्रष्टाचाराला मूठमाती, सुशिक्षित बरोजगारांना नवद्योजक बनण्याची प्रेरणा, मराठी माणसाचे हीत व दोन भावांचे बंधुप्रेम दाखविणारा दमदार असा हरिओम चित्रपट लवकरच प्रेक्षक रसिकांच्या भेटीला येत आहे. छ.संभाजी राजे यांच्या हस्ते हरिओम चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

विशेष म्हणजे रायगडच्या भूमी पुत्रांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यामुळे हरिओमचा चित्रपट विश्वात बोलबाला दिसून येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी महाराष्ट्र राज्यातील जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद, पाठिंबा व भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. छ. शिवाजी महाराजांच्या नावाचा केवळ जयघोष न करता त्यांचा जनहितार्थ विचार मनामनात रुजविणे व आचरणात आणणे असा प्रेरक संदेश या चित्रपटातुन देण्यात आलाय, या चित्रपटाचा प्रभाव युवापिढीसह आबाल वृद्धांवर पडेल असा विश्वास चित्रपटाचे अभिनेते हरिओम यांनी व्यक्त केला. छ.शिवाजी महाराज व छ.संभाजी राजांच्या आदर्श व प्रेरक विचारधारेवर आधारीत “हरिओम” चित्रपटाच्या प्रचार प्रसारासाठी ताराराणी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष वंदनाताई मोरे राज्य दौऱ्यात सहभागी होऊन मराठी माणसाचा चित्रपट सुपरहिट करण्यासाठी पूर्ण कुटुंबासह हा चित्रपट पाहावा असे आवाहन देखील मोरे करीत आहेत. सदर चित्रपटात रायगडच्या ऐतिहासिक व क्रांतिकारी भूमीतून कलाकारांना अभिनयाची संधी देण्यात आलीय.

या चित्रपटात अभिनेता ओम याने रियल हिरोची भूमिका बजावत तरुणांना निरोगी व सदृढ शरीरयष्टी चे महत्व पटवून दिले आहे. चित्रपटातील डायलॉग ऐकून धमन्याधमन्यातून रक्त सळसळते. यातील पात्र आणि प्रसंग मनाला भिडतात. शूटिंग आणि कॅमेऱ्याची कमाल तर लाजवाब दिसून येते. काही प्रसंग असे चित्रित केले आहेत की हाताच्या मुठी आवळल्या जातात. तर काही प्रसंग रडवून देखील जातात, क्षणभर मनोरंजनाची फोडणी देखील देण्यात आलीय. अशातच आक्रमकता, धाडस, शौर्य, साहस आदींचा मिलाप ओम च्या अभिनयातून दिसून येतोय. या चित्रपटातील कलाकारांनी जिव ओतून भूमिका साकारल्या आहेत. ज्या भूमिका अभिनय नसून खऱ्या वाटत आहेत.

दमदार कथा, पटकथा, संवाद, चित्रीकरण, अभिनय, उत्तम कलाकार, संगीत, तसेच प्रत्येक कलाकारांच्या तोंडी शोभतील असे संवाद यामुळे या चित्रपटाची मेजवानी काही औरच असणार आहे. मराठी माणसाला गर्व व अभिमान वाटेल अशा चित्रपटाची निर्मिती हरिओमच्या निमित्ताने झाल्याने मराठी चित्रपट विश्वाला एक नवी झळाळी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हरिओम चित्रपट आपण आपल्या कुटुंबियांसोबत देखील पाहू शकणार आहोत. चित्रपट प्रेमींना आकर्षित करणारा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर प्रदर्शित व्हावा याकडे सारेच डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृह बहुचर्चित चित्रपटाच्या प्रतीक्षेत असून हा चित्रपट धमाल उडवून देत चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवेल असा विश्वास छ. संभाजी राजे यांनी व्यक्त करून शुभेछा दिल्या. महाराष्ट्राच्या मातीतील कलाकारांना मायबाप रसिक जनतेने भरभरून प्रेम द्यावे असे आवाहन अभिनेते हरिओम यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *