उत्तम कारभार करून भागभांडवल, निधी व उलाढाल वाढविण्यात कुंडलिका पतसंस्था अग्रेसर ; अड . जे . टी . पाटील

Share Now

220 Views

रोहा (वार्ताहर) कुंडलिका पतसंस्थेने आपल्या खर्चात काटकसर करून सभासदांना १४ टक्के लाभांश दिला, तसेच संस्थेने उत्तम कारभार करून ठेवी , भागभांडवल, निधी व उलाढाल वाढविण्यात कुंडलिका पतसंस्था अग्रेसर असल्याचे गौरवोदगार रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अड. जे. टी. पाटील यांनी काढले.

कुंडलिका पतसंस्थेतर्फे आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा व गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख अतिथी रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष अड. जे.टी. पाटील बोलत होते. यावेळी महासंघाचे सचिव योगेश मगर हे सुध्दा उपस्थित होते. कुंडलिका पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत विद्यार्थी व रोहा परिसरातील विशेष कार्य करणा-या नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गंभीर स्वरुपाच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना जीवनदान देणारे डॉ. अपूर्व भट, कोविड रुग्णांची सेवा करणारे डॉ. सौ. रश्मी हुगे, शंतनु आठवले, सुराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर, सैन्यदलात निवड झालेले निशांत कुलकर्णी, जनकल्याण समितीचे श्रीनिवास साठे, राष्ट्रसेविका समितीच्या महिला प्रतीनिधी यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनी सांगितले की, रोहा परिसरात उत्कृष्ठ समाजसेवा करणा-या व्यक्तींचा सन्मान करून त्याचा आदर्श जगासमोर आणणे, ही या संस्थेची सामाजिक बांधिलकी आहे. तसेच या पतसंस्थेने गेली ३० वर्षे नातं आपुलकीच ठेवा विश्वासाचा हे ब्रीदवाक्य जपून विश्वासर्ह सेवा दिली आहे व यापुढेही हे व्रत अखंडपणे सुरूच राहील. वार्षिक सर्वसाधारण सभेत  संचालक अशोक जोशी यांनी इतिवृत वाचन केले. अध्यक्ष चंद्रशेखर जोशी, उपाध्यक्ष विवेक वत्सराज, तज्ञ संचालक अविनाश दाते यांनी अहवालातील मुद्यांवर विवेचन केले. तसेच सभासद गजानन मळेकर, वत्सराज सर, मोरेश्वर लिमये, एकनाथ मरवडे, अभिजीत अत्रे, श्रीधर राऊत, निखिल दाते, सुनील पेंडसे, रविंद्र मनोहर, यज्ञेश भांड, मनोहर सोनार यांनी चर्चेत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक प्रमोद काळवीट यांनी केले. तर आभार प्रदर्शन संचालीका सौ. जयश्री भांड यांनी केले. सदर सभेची सांगता वंदे मातरम गायनाने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *