नागोठणे किंग बेकरीत पावात विष्ठा (लेंड्या)

Share Now

189 Views

नागोठणे ( याकुब सय्यद) नागोठणे किंग बेकरी मधील पावामध्ये उंदरांची विष्ठा (लेंडया) सापडली असून ग्राहकांच्या जीवाशी खेळणार्‍या बेकरीवाल्याचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सदरील बेकरीमध्ये अस्वच्छता व मानवी कायदा तरतूदींचे उल्लघन केले असल्याने पेण येथील अन्न व औषध प्रशासनाकडून बेकरी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

पाली – कुंभारशेत येथील तक्रारदार सचिन डोबले हे गुरुवारी एका हॉटेलमध्ये भाजी पाव व दोन एक्स्ट्रा पावच्या पार्सलची ऑर्डर केली. आलेल्या पार्सलमधील पाव भाजीच्या पाहिल्याच पावामध्ये डोबले यांना काही तरी काळे दिसले. ते निरखून पाहिल्यानंतर ते काळे उंदरांची (विष्ठा) लेंडी असल्याचे समजले.

याबाबत हॉटेल मालकाला विचारणा केली असता सदरील पाव फेरीवाल्या मार्फत किंग बेकरीमधून आणल्याचे सांगीतले. त्यानुसार डोबले यांनी सदरील घटनेची रीतसर तक्रार नागोठणे पोलिस ठाणे, नागोठणे ग्रामपंचायत व पेण येथील अन्न व औषध प्रशासनाकडे केली. तक्रार दाखल होताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सचिन आढाव व विक्रम निकम हे आपल्या सहकार्‍यांसह बेकरीमध्ये तात्काळ दाखल झाले. त्यांनी पंचासह सदरील ठिकाणची पाहणी केली. बेकरीमध्ये सर्वत्र अस्वच्छता व कायदा 2006 मधील तरतूदींचे उल्लघन केल्यामुळे व्यवसाय बंद करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाकडून दिले आहेत. सतत होत असलेल्या बेकरीवाल्याचा निष्काळजीपणा ग्राहकांच्या जीवाशी खेळत असल्याबद्दल शहरात संतापाची लाट उसळत असून अशा बेफिकीर बेकरीवर कायदेशीर कठोर कारवाई करून बेकरी कायम स्वरूपी बंद करण्याची मागणी तक्रारदार सचिन डोबले व विभागातील नागरिकांकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *