ठाकरे पवार कंपनीच्या आहारी गेलेत, म्हणून उन्मळून पडणारा वटवृक्ष आम्ही सावरला, मग गद्दार कसे ? विश्वासघातकीचा बदला घेणार, तटकरेंवर अप्रत्यक्ष घणाघात शिंदे सेना गटाचे प्रतोद भरत गोगावले तटकरेंच्या ‘रोहा’ होमग्राउंडवर कडाडले

Share Now

373 Views

रोहा (राजेंद्र जाधव) आदित्य ठाकरे रायगडात होते, त्याचवेळेपासून बंडाची तयारी होती. याचे मागसूस सुतारवाडीलाही लागू दिले नाही. ठाकरे हे पवार कंपनीच्या आहारी गेलेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वटवृक्ष उन्मळून पडत होता. तो वटवृक्ष आम्ही वेळेस सावरायला प्रारंभ केले, मग आम्ही गद्दार कसे, आज आमच्यासोबत ५० आमदार, १२ खासदार आहेत. अजून येतील. मग आम्ही पक्ष कसा सोडला. आम्ही गद्दार मग ते खुद्दार का ? असा खडा सवाल करत अलिबाग, महाडमधील गॅपही (श्रीवर्धन)आम्ही भरून काढणार, याचाही बदला घेणार, असा गर्भित इशारा नाव न घेता तटकरेंना देत ‘रोहा’ होमग्राउंडवर शिंदे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले जबरदस्त कडाडले. रोह्यातील २६ गाव पाणी योजनेसाठी तब्बल ४० कोटी रुपये शिंदे सरकारने मंजूर केले, तेही तटकरेंना खुपले. भूमिपूजनाला आलात, पण ते उदघाटनाला येणार नाहीत. आता रायगडला जाग आली आहे, त्यांचा बदला घेणार असे आक्रमक शैलीत आ. भरत गोगावले यांनी ठाकरे मुख्यतः तटकरेंच्या राजकारणाचा समाचार घेतला. ते रोहा येथे आयोजित रोहा तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत बोलत होते.

रोहा येथील शासकीय विश्रामगृह सभागृहात शनिवारी सायंकाळी शिवसेनेची आढावा बैठक झाली. त्यावेळी व्यासपीठावर आ. महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी, प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख अरुण चाळके, तालुकाप्रमुख एड. मनोज शिंदे, उस्मान रोहेकर व पदाधिकारी उपस्थित होते. ही गर्दी बोलावून नाही, स्वतःच्या मर्जीने कार्यकर्ते आढावा बैठकीला आलेत. आमच्या संपर्कात अनेक नेतेगण, कार्यकर्ते आहेत. आमच्या पाठीशी रहा. विकासकामे करायची आहेत. २६ गाव पाणी योजनेसाठी ४० कोटी मंजूर केलेत. ते सहाही सरपंच आपले आहेत. शिंदे शिवसेनेची ताकद अधिकच वाढत आहे. राष्ट्रवादीचे नेतेही संपर्कात आहेत. आता वादळ कोणीही रोखू शकत नाही, असे प्रास्ताविकात सांगत तालुकाप्रमुख एड. मनोज शिंदे यांनी अक्षरशः धमाका उडवून दिला. आमच्यावर पालकमंत्री लादले, तीन आमदार असताना सेनेला न्याय नव्हता. पण आता आम्ही श्रीवर्धनचेही पालकत्व स्वीकारले आहे. सातबारा कोणाच्या नावावर नाही, असा पलटवार जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरेंवर केला. तर गद्दार म्हणणारेच आता तोंडावर पडायला सुरुवात झाली आहे. आमच्या सोबत ५० आमदार, १२ खासदार आले, अन्य नेतेगण आले, ते वेडे कसे, त्यांनी तत्व गहाण टाकले, पक्ष लाचार केला, रायगडातही सेनेला फायदा झाला नाही, म्हणून बंडाचा असंतोष उफाळून आला, अशी फटकेबाजी संपर्कप्रमुख अरुण चाळके यांनी केली.

भाषणात आ. महेंद्र दळवी यांनीही तटकरेंच्या रोहा होम ग्राउंडवर जोरकस भाषण केले. यापुढे मंत्री, पालकमंत्री आपलेच आहेत. खरा उठाव रायगडमधून झाला. काही गोष्टी जाहीर सभेत बोलू, आम्हाला राष्ट्रवादीपासून मुक्ती मिळाली. पालकमंत्री हटाव ऑपरेशन पूर्ण झाले. आता लोकहिताच्या कामाचा निर्णय घेतला आहे. अवघड प्रसंगात आमच्या मागे राहिलात, त्याचे दायित्व आम्ही स्वीकारले. चिंता नको, धनुष्यबाणही मिळणार आहे. त्यांना आता उठून द्यायचे नाही, जिल्हा परिषदेवरही भगवा फडकवू, राष्ट्रवादीला सुरुंग नक्की लावणार, अलिबागमधील राष्ट्रवादीचे नेतेही संपर्कात आहेत, असे तटकरेंना डिवचत आ. दळवींनी तटकरेंच्या राजनीतीचा पर्दाफाश केला. तर म्हसाडी धरणाला पवार, तटकरेंची दृष्ट लागली. पण म्हसाडी धरणाबाबत शासन सकारात्मक आहे, अशी माहिती आ. महेंद्र दळवींनी दिली. पक्षप्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे मुख्यतः सुनील तटकरेंवर जोरदार प्रहार केले. ठाकरे हे पवार कंपनीच्या आहारी गेलेत, हिंदुत्वाचा वटवृक्ष उन्मळून पडत होता. तो आम्ही सावरून वटवृक्ष अधिक बहरण्यासाठी सज्ज आहोत. मग आम्ही गद्दार कसे, पक्ष सोडला कसा ? असा सवाल करीत आ. गोगावले यांनी बंडाची तयारी आदित्य ठाकरे रायगडात असताना, सुतारवाडीला पाहुणाचारासाठी गेलेले असतानाच सुरू होते, ही मेक गोगावलेंनी उपस्थितांना ऐकवली. आता आपण विकासाचे राजकारण करु, निर्णय तुम्हाला विचारून घेऊ, त्याही (श्रीवर्धन) मतदारसंघात विकास करू, महाड अलिबाग मधील श्रीवर्धन गॅपही भरून काढू असे सांगत गोगावलेंनी थेट तटकरेंना ईशारा दिला. तर ‘द सिंचन फाइल्स’ चित्रपट चर्चेत आल्यास शहानिशा करू, तोही चित्रपट पूर्ण करू असेही गोगावले यांनी सांगत तटकरेंवर कारवाईचे अप्रत्यक्ष संकेत दिल्याने पुढे काय होते ? याच चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. दरम्यान, आढावा बैठकीच्या बॅनरवर शिंदे गट न लिहिता रोहा तालुका शिवसेना लिहिल्याने नक्की खरी शिवसेना कोणाची ? असा सवाल पुन्हा नव्याने उपस्थित होऊन सेना कार्यकर्त्यात संभ्रमचे वातावरण निर्माण झाले आहे, तर आता ऍड. मनोज शिंदे व समीर शेडगे दोन्ही शिंदे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत झाल्याने आगामी निवडणुकांत सेना, शिंदे सेना गटात संघर्ष वाढणार हे अधोरेखीत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *