बिरवाडी (सतिश जाधव केंद्रशासन तसेच राज्य शासनाच्या विविध सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे गेले ३ महिन्याचे मानधन थकीत असून गणेशोत्सवापूर्वी किमान २ महिन्याचे मानधन होईल अशी आशा राज्यातील सर्व संगणक परिचालकांना होती परंतु एका महिन्याचे देखील मानधन CSC-SPV कडून न झाल्याने राज्यातील संगणक परिचालकांच्या मनात चीड निर्माण झाली आहे आणि त्यामुळे किमान एक महिन्याचे तरी मानधन CSC-SPV स्वतःच्या खिशातून देऊ शकत नाही का? असा सवाल संपूर्ण महराष्ट्रातील संगणक परिचालक विचारत आहेत.
CSC-SPV या कंपनीला ग्रामपंचायत कडून एक केंद्रा मागे सुमारे १२ हजार रु.मिळतात त्यातले ऑपरेटरला मानधन पोटी ७ हजार दिल्यानंतर राहिलेल्या ५ हजार मधून सुमारे २ हजार टॅक्स गेला तरी राहिले ३ हजार, म्हणजे एक महिन्याला ३ हजार एक केंद्राचे असे २२ हजार केंद्र म्हणजे महिन्याला ६ कोटी ६० लाख कंपनीच्या घशात जातात. या कंपनीला ६ वर्षे झाले म्हणजे कंपनीचा ६ वर्षे म्हणजे ७२ महिन्याचा नफा किती असेल हे आपल्याला मोजता देखील येणार नाही आणि एवढा सर्व कारभार फक्त आणि फक्त ऑपरेटर च्या जीवावर ही CSC-SPV कंपनी फक्त महाराष्ट्रातून कमावते आणि हिला किमान एक महिन्याच्या मानधनाची जबाबदारी जर घेता येत नसेल तर ही असली कंपनी काय कामाची? असा संतप्त सवाल महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्यसचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयुर कांबळे यांनी केला आहे.