लम्पि स्किन आजाराबाबत जिल्हा पशुसंवर्धन विभाग सतर्क:रायगड जिल्ह्यात प्रादुर्भाव नाही.

Share Now

260 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात अधिक प्रमाणात तर म्हैसमध्ये कमी प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते.लम्पि स्किन आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून रायगड जिल्हा प्रशासनं सतर्क झाले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नाकर काळे यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम,डॉ. राजेश लालगे,डॉ. कृतिका तरमाले यांच्यासाहित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. काळे यांनी सांगितले की,लम्पी स्कीन डिसीज हा विषाणूजन्य चर्मरोग असून हा साथीचा आजार गोवर्गीय व म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये आढळून येत आहे. गोवर्गात तीस टक्के, म्हैसमध्ये १.६ टक्के तुलनेत अधिक प्रमाणात आढळून येतो. सर्वसामान्यपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरात या आजाराची तीव्रता अधिक असते. या आजारात मृत्यू दर १-५% पर्यंत आढळून येतो. दुग्धउत्पादन मोठया प्रमाणावर घटते तसेच काही वेळा गर्भपात होतो व प्रजनन क्षमता घटते.अज्ञात रोगाची लागण होत असून हा लम्पी स्किन डिसीज (त्वचारोग) आहे असे तज्ज्ञांनी सांगीतले. अचानक ताप व त्वचेवर गुत्ती (गाठी) येत असल्याने पशुपालन शेतकरी बांधव चितांग्रस्त झाले आहेत.मात्र रायगड जिल्ह्यात असा रोगाचे रुग्ण नसल्याने चिंता करण्याची गरज नाही. रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यात पाच संशयित रुग्ण सापडली होती.त्यांचे नमुने घेऊन ती पुणे येथे पाठवून त्यांच्यामार्फत देशातील राष्ट्रीय पातळीवर असणारी भोपाळ येथील प्रयोगशाळेत तपासणी करिता पाठविली होती.मात्र त्याचा अहवाल हा निगेटिव्ह आला असल्याने रायगड जिल्ह्यात सद्यस्थितीत लम्पि रोगाची लागण असलेले एकही जनावर नाही. मात्र पशुसंवर्धन विभागामार्फत योग्य ती काळजी घेतली जात आहे.

या रोगाचा प्रसार प्रसार मुख्यत्वे चावणाऱ्या माश्य (स्टोमोक्सीस), डास (अडीस), गोचीड, चिलटे (कुलीकॉईडीस) यांच्या मार्फत होतो. तसेच या आजाराच्या विषाणूचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शाने होऊ शकतो. विषाणू संक्रमण झाल्यानंतर ते १- २ आठवड्यापर्यंत रक्तामध्ये राहतात. त्यानंतर शरीराच्या इतर भागात संक्रमित होतात. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळयातील पाणी व तोंडातील लाळेतुन विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दुषित होतो. त्यातून इतर जनावरांना या विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. विर्यात विषाणू येत असल्याने रोगाचा फैलाव कृत्रिम किंवा नैसर्गिक रेतनातून होऊ शकतो. गाभण जनावरांत या आजाराची लागण झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होतो.अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.शामराव कदम यांनी दिली आहे. राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव

राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश पाठोपाठ सध्या महाराष्ट्रातही लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील पशुपालक सध्या चिंतेत आहेत. राज्य पशुसंवर्धन विभागाकडून लम्पी आजार नियंत्रणात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात हा त्वचा रोगाचा पादूर्भाव झाला आहे. संपूर्ण राज्यात आठशे पन्नास जनावरांना लम्पीने ग्रासले आहे. त्यापैकी आतापर्यंत पाचशे नव्वद जनावरे बरी झाली असून उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. तर संपूर्ण राज्यात आतापर्यंत दहा जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात २३९००० गोवर्गीय पशुधन आहे. गायीला या रोगाचा संसर्ग जलदगतीने होतो तर म्हैसला कमी प्रमाणात होतो.

रायगड जिल्ह्यात लम्पि स्किन आजाराची मुरुड तालुक्यातील कोर्लई आणि बोर्ली येथे पाच संशयास्पद जनावरे आढळून आली होती.त्याच्यावर योग्य ते उपचार व विलगिकरणकरण्यात आले असून त्यांच्यापासून नवीन एकाही जनावराला लागण झालेली नाही.व ती जनावरे उपचाराने बरी झाली आहेत.तसेच त्या जनावरांमध्ये रक्त नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.तेथून ते नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय पशु संशोधन केंद्र येथे पाठविण्यात आले होते.व त्याचे निकाल आले असून ते नकारात्मक आहेत. रायगड जिल्ह्यात लम्पि स्किन रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्ह्यालगत असलेल्या इतर जिल्ह्याच्या तसेच महाराष्ट्र शासनाने लगत राज्याच्या सीमा जनावरांच्या वाहतुकीसाठी बंद केल्यात आहेत.

रायगड जिल्हयात जनावरांचे बाजार भरण्यावर बंदी घालण्यात आली असून जनावरांच्या शर्यती घेण्यात येऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी काढले आहेत.रायगड जिल्हयातील एकशे बावीस पशुवैद्यकीय संस्था असून त्यांच्या कार्यक्षेत्रात लम्पि स्किन आजाराचा रुग्ण आढळून आल्यास योग्य तो औषध उपचार करणे बाधित जनावराचे विलगिकरण करणे व संसर्ग होण्यापासून नियंत्रण करणे व पाच किलोमीटर अंतराच्या वर्तुळाकारात लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. रत्नाकर काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शामराव कदम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे च्या माध्यमातून दिल्या आहेत.रायगड जिल्ह्यात सर्व पशुवैद्यकीय संस्थेमध्ये लम्पि स्किन आजारावर उपचार करण्यासाठी मुबलक औषध उपलब्ध असून बाधित क्षेत्रात लसीकरण करण्यासाठी दहा हजार लस मात्रा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.पशु पालकांना असा आजाराचा संशय आल्यास १९६२ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभाग रायगड कडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *