अवैध धंदे जैसे थे, रोहा, कोलाड, नागोठणेत मटका, जुगार, हातभट्टी जोशात, चाललेय काय ? तरुण पिढी व्यसनाच्या आहारी, कोणालाच पडले नाही !

Share Now

488 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रायगड जिल्हा सध्या विविध अवैध धंद्याची ओळख देणारा ठरत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या उत्तम सहकार्यातून प्रत्येक तालुक्यात मटका, जुगार, हातभट्टीने अक्षरशः ठाण मांडले आहे. त्यात मुरुड, रोहा, माणगाव, श्रीवर्धन व अन्य तालुक्यात मटका, जुगार, गावठी हातभट्टीने सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले. याबाबत वारंवार तक्रारी होऊन, संबधीत पोलीस प्रशासनाबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त होऊनही जिल्हा पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत नाही, याचे आश्चर्य व्यक्त होत असतानाच रोहा तालुक्यातील कोलाड, नागोठणे, चणेरा खुद्द रोहा शहरातील अवैध धंदे जैसे थे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले. कोलाड, नागोठणे, रोहा शहरात मटका, जुगार, हातभट्टी अगदी जोशात सुरू आहे. शहरातील प्रसिद्ध त्रिवेणी संगम जुगार क्लबही तेजीत सुरू असल्याने चाललेय काय ? असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, कोलाड, वरसे, धाटाव विभागात गावठी हातभट्टी विक्रीने तरुण पिढी बरबाद होत आहे, गावठी हातभट्टी सहज मिळत असल्याने तरुण मटका, जुगार क्लब यांसह हातभट्टीच्याही अगदी आहारी जाऊन कुटुंब उध्वस्त करून बसत आहे. याबाबत कोणालाच काही पडले नाही, असेच धक्कादायक वास्तव सध्यास्थितीत दिसत आहे, तर रोहा शहरातही बोकाळलेले अवैध मटका, जुगार क्लब, हातभट्टी पूर्णतः बंद करण्याचे धाडस रोहा पोलीस प्रशासन दाखविल का, की आधीच्या पोलीस अधिकाऱ्यांचा धंदे बंद न करण्याचा कित्ता गिरवितील ? हे लवकरच समोर येणार आहे.

राज्य यांसह जिल्ह्यात मुख्यतः शिंदे सरकार आल्यापासून सर्व जिल्हा, तालुक्यात विविध अवैध धंदे चांगलेच स्थिर झालेत. रायगडातील सर्वच तालुक्यात मटका, जुगार, गावठी हातभट्टीने डोके वर काढल्याचे भयान चित्र समोर आहे. अवैध धंदात रोहा तालुकाही एक पाऊल पुढेच आहे. रोहा पोलीस प्रशासन देवकान्हे विषारी हातभट्टी कांड विसरला की काय ? असेच वाढत्या हातभट्टी उत्पादन व विक्रीतून बोलले जात आहे. केळदवाडी, निवी ठाकूरवाडी, चणेरा वरकस पट्ट्याच्या काही भागात गावठीचे उत्पादन होते, तीच गावठी रोहा व परिसरात विक्री होते. गावठी सहज मिळत असल्याने तरुण पिढी अक्षरश: बरबाद होत आहे. जोडीला शहरात विषारी ताडीमाडी आहेच, याकडे पोलीस व उत्पादन शुल्क प्रशासन दुर्लक्ष करीत असतानाच कोलाड, नागोठणे यांसह रोहा शहरात मटका, जुगार क्लब, जुगार चक्री ऑनलाईन धंदे ठिकठिकाणी सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासन लक्ष देत नसल्याने तरुण पिढी वाया घालविण्याचा विडा जिल्हा पोलीस प्रशासनाने उचलला काय ? अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते ऐड. काशिनाथ ठाकूर यांनी दिली. दुसरीकडे रोह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध त्रिवेणी संगम’वर झाडाझडती घेतल्याची चर्चा झाली. त्याबाबत रोहेकारांनी अंशतः समाधान व्यक्त केले. मात्र जुगार क्लब त्रिवेणी संगम फुल्ल टू चालू असल्याचे खात्रीशीर वृत्त असल्याने अवैध धंदे रोखण्यात पोलीस प्रशासन सध्यातरी अपयशी ठरल्याची चर्चा चोहोबाजुने सुरु आहे.

राज्यात मटका, जुगार, हातभट्टीसारखे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आणणारे अवैध धंदे सुरू आहेत, असा महत्त्वाचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. त्यावर राज्यात अवैध धंदे चालू देणार नाही, त्याबाबत कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रत्यक्षात रायगडातील बहुतेक तालुक्यात मटका, जुगार, हातभट्टी, जुगार क्लब बिनधास्त सुरू असल्याचे चित्र असल्याने रायगड पोलीस प्रशासनाला वेगळी परवानगी दिलेय की काय ? असे वैतागलेल्या नागरिकांतून धडकपणे बोलत जात आहे. कोलाड, नागोठणे, चणेरा, रोहा शहरात धाडसाने जुगार, मटका, त्रिवेणी संगम जुगार सुरू असल्याने त्यावर ठोस कारवाईची भूमिका पोलीस प्रशासन घेतो का? हे आता पाहावे लागणार आहे. रोहा शहर, वरसे, खारगाव, धाटाव, कोलाड शहर ग्रामीणात हातभट्टीचीही बिनधास्त विक्री सुरू असल्याने संबंधीत पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी पुन्हा जोर धरत आहे. याउलट त्रिवेणी संगमची झाडाझडती घेणाऱ्या रोहा पोलिसांनी जुगार, क्लबसह मटका, जुगार चक्री ऑनलाइन, गावठी हातभट्टीबाबत पोलीस प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी याच मागणीत तालुक्याच्या विविध भागातील अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासन कठोर कारवाई करतो का ? हे पुन्हा एकदा स्पष्ट होणार आहे. दरम्यान, कोलाड, नागोठणे, चणेरा मुख्यतः रोहा शहरातील मटका, जुगार क्लब, गावठी हातभट्टी अवैध धंद्यांवर रोहा पोलीस उशिरा का होईना नेमकी काय कारवाई करतात ? याकडे पुन्हा नव्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *