रोहा रेल्वे पोलिसांचे ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ ,रेल्वे फलाटावर सापडलेल्या बालकास केले पालकांच्या सुपूर्द

Share Now

232 Views

अष्टमी (महेंद्र मोरे) रेल्वे सुरक्षा बला तर्फे रेल्वेच्या मालमत्तेच्या रक्षणासह प्रवश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध अभियान राबविण्यात येतात. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या रोहा रेल्वे पोलीस चौकीवरील अधिकारी व कर्मचारी हे सर्व अभियान कर्तव्यदक्षपणे राबवत यशस्वी करत असल्याचे वारंवार समोर येत आहे. यातीलच ऑपरेशन ‘नन्हे फरिश्ते’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी नुकतीच रोहा रेल्वे पोलीस चौकी मधील कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने नुकतीच केली. यामध्ये रोहा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वर नजीकच्या अष्टमी मोहल्यातुन घराचा रस्ता विसरून आलेल्या बालकास त्याच्या पालकांकडे सुखरूपपणे सुपूर्द करण्याची कामगिरी करत आपले कर्तव्य पार पाडले. आपला हरवलेला मुलगा काही तासांत सापडल्याचे आनंद त्या मातापित्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वहात होता.

यासंबंधी रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार रोहा रेल्वे पोलिसांचे मुख्य आरक्षक बी. के. दिवशे व बी. एस. वर्मा हे फलाट क्रमांक १ वर कर्तव्यावर तैनात होते. त्यावेळी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एक लहान मुलगा रडत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती तात्काळ उपनिरिक्षक राकेश पाटीदार यांना दिली. उपनिरिक्षक पाटीदार हे तत्परतेने फलाट क्रमांक १ वर जात त्या मुलाची चोकशी करु लागले. मात्र ते लहान मुल आपले नाव व पत्ता सांगु शकत नव्हते.त्याच वेळी फलाटाव थांबलेल्या गाडी न. ०१३४८ मध्ये त्या मुलाचे पालक सापडतात का यासाठी ध्वनिक्षेपका द्वारे घोषणा केली. मात्र कोणीही पालक समोर आले नाहीत. अखेर त्या लहान मुलाला रेल्वे पोलीस चौकीत आणण्यात आले. त्यानंतर आजुबाजुच्या परिसरात त्या लहान बालकाच्या पालकांबाबत रेल्वे पोलिसांनी तपासास सुरुवात केली. त्याच वेळी पावणे पाचच्या दरम्यान अष्टमी येथे राहणारे मोहम्मद वाजीद व त्यांची पत्नी हे रेल्वे स्थानक परिसरात आले. ते आपल्या हरवलेल्या लहान मुलाचा शोध घेत असल्याचे त्यांनी रेल्वे पोलिसांना सांगितले. त्यावेळी चौकीत असणारा बालक रेल्वे पोलिसांनी त्यांना दाखविला. त्याला पाहताचा आईबापांनीं आपल्या मुलाला ओळखले व तो लहान मुलगाही धावत त्यांना जाऊन बिलगला. अरहान वय ३ वर्षे हा आपला मुलगा असून आज दुपारी घराबाहेर खेळता खेळता गायब झाला व तेव्हां पासून आम्ही त्याचा शोध घेत असल्याचे पालकांनी सांगितले. त्यानंतर निरीक्षक राजेंद्र जगताप यांना यासंबंधी सर्व माहिती देत सर्व सर्व कागदोपत्री कारवाई करत त्या मुलाला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केला. गणेशोत्सवाच्या रेल्वे प्लॅटफॉर्म वरील गर्दितही या हरवलेल्या बालकाला कर्तव्यदक्षपणे त्याच्या पालकांकडे सुखरूपपणे सुपूर्द केल्याबद्दल रोहा रेल्वे पोलिसांचे पालकांनी आभार मानले. रोहा रेल्वे पोलिसांचे या माणुसकी जपणाऱ्या कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *