रोहा : पावसाचा फायदा घेत विषारी वायूची ‘धुपारत’ सुरूच, दखल कोणी घेईना ? एमपीसीबी’चे अधिकारी ‘फेल’. ग्रामस्थ संतप्त

Share Now

164 Views

रोहा (राजेंद्र जाधव) रोहा शहर यांसह ग्रामीण भाग रस्त्यातील खड्डे, घाणीची साम्राज्य यांसह विविध समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खासदार, दोन आमदार असलेल्या तालुक्यातील सर्वच रस्ते अक्षरशः धोकादायक झालेत. यातून खा. सुनील तटकरेंचा प्रशासनावरील दबदबा अंशतः कमी झालेय की काय ? याच चर्चेत रोजच्या विषारी वायूची भर पडत आहे. पावसाचा फायदा घेत धाटाव एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी रोज रात्रौ विषारी वायूची धुपारत सुरूच ठेवली. धाटाव, बारसोली परिसर दिवस रात्र विषारी धुक्यात हरवत आहे. दुसरीकडे रोठ, तळाघर, निवी, वरसे यांसह संबंध शहरात दररोज रात्रौ विषारी वायूने अक्षरश: हैदोस घातल्याचे भयान दृश्य पाहायला मिळत आहे. अंधार सायंकाळी पसरलेल्या विषारी धुक्याच्या वासाने मळमळ, डोळ्यांची चूरचूर, डोकेदुखी, चक्कर, श्वसनाचे त्रास होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्यात. विषारी वायू संबंधी एमपीसीबी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र एमपीसीबीचे अधिकारी विषारी वायू प्रदूषण रोखण्यात फेल झाल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. दरम्यान, खड्डे, कचरा समस्या मुख्यत: विषारी वायूच्या गंभीर घटनांची कोणीच दखल घेत नाही, स्थानिक तहसील प्रशासनही संबधीत कंपन्यांवर कारवाई करण्यात धाडस दाखवित नाहीत. त्यामुळे वायू प्रदूषण बाधीत गावातील नागरिक आता अधिक संतप्त झाल्याचे समोर आले आहे, तर वायू प्रदूषण नियंत्रीत स्वयंत्रणा दुरुस्ती करावी, मार्गदर्शक तत्वे पाळावीत अशा सूचना आम्ही वारंवार केल्या, पण त्याकडे संबधीत कंपन्या कायम दुर्लक्ष करतात, आता वायू प्रदूषण संदर्भात गांभीर्याने दखल घेत कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन कामत यांनी दूरध्वनीवरून सलाम रायगडला दिले. त्यामुळे एमपीसीबी प्रशासन वायू प्रदूषण रोखण्यात आता कितपत यशस्वी ठरतो ? हे पुन्हा नव्याने पाहावे लागणार आहे.

धाटाव एमआयडीसीतील अनेक बदमाश कंपन्या बिनधास्त वायू प्रदूषण करीत आल्यात .संबधीत अधिकाऱ्यांचे यथोचित पाहुणाचार करीत असल्याने आमचे काही वाकडे करू शकत नाहीत अशाच अविर्भावात काही कंपन्यांचे स्थानिक अधिकारी कायम वागत आलेत. तरीही सलाम रायगडच्या दणक्याने आतापर्यंत एक्सेल, सॉल्वे, युनिकेम कंपन्यांवर मोठी कारवाई झाल्याचे इतिहासात नोंद आहे. युनिकेम, अन्शूल, एक्सेलसारख्या कंपन्यांना वारंवार नोटीस बजावण्यात आल्या. अनेक कंपन्यांवर क्लोजर कारवाई करण्यात आली. त्या प्रसंगात नरमाईच्या भूमिकेत वावरणारे अधिकारी पुन्हा जल, वायू प्रदूषण करत प्रताप सुरू करतात. काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी एका एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांच्या मेहुण्याला आम्ही ठेकेदारी दिली, असे बेधडक सांगितले. याची तक्रार एमपीसीबीचे उपप्रादेशिक अधिकारी किल्लेदार यांच्याकडे केली होती. याच सर्व घटनाक्रमात दुर्लक्ष केल्याने कंपन्या कशा धोकादायक ठरतात हे एक्सेलने आठवडाभरातील स्फोट घटनेने दाखवून दिले, हे वास्तव असतानाच डीएमसी, सॉल्वे, अंन्शूल, युनिकेम, एक्सेल, क्लरिअंट, अँथेआ कंपन्यांच्यामागील रोठ, तळाघर, निवी, वरसे गांव यांसह शहरात मागील आठवडावर विषारी वायूची धुपारत सुरूच आहे. वातावरणातील धुक्यात विषारी दर्प जाणवत असल्याने अनेकांना मळमळ, डोळ्यांची चुरचुर, उलटी यांसह श्वाससंबंधी समस्या उद्भवल्या. पूर्ण परिसरात विषारी धुका आच्छादल्याने अनेकांनी घराचे दरवाजे बंद करून घेतले, हे रोजचे विषारी वायू प्रदूषण डीएमसी, सॉल्वे, युनिकेम, अन्शूल, एक्सेल, अँथेआ, क्लरिअंट कंपन्यांचे असल्याची भीती युवानेते अमित मोहिते यांनी व्यक्त केली. दरम्यान, सततचे वायू प्रदूषण रोखण्यात एमपीसीबी यांसह स्थानिक तहसील प्रशासन कायम अपयशी ठरत आहे. अखेर रोजच्या वायू प्रदूषणाबाबत खुद्द एमपीसीबीचे अधिकारी कामत यांनी संमती दर्शवली. वातावरणात वायू प्रदूषणाची मात्रा दिसून येत आहे, संबंधीत कंपन्याने प्रदूषण नियंत्रित स्वयंत्रणा दुरुस्त केले नाहीत, युनिकेम, अन्शूल व तक्रारीतील अन्य कंपन्यांना तातडीने नोटीसा बजावून योग्य ती कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन कामत यांनी दिल्याने वायू प्रदूषण अंशतः रोखण्यात आतातरी एमपीसीबी प्रशासनाला यश येते का ? हे समोर येणार आहे, तर संबधीत कंपन्यांवर एमपीसीबी प्रशासन नक्की काय कारवाई करतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.