रायगडात मुसळधार, रोहा, महाड, नागोठणे, पाली ‘हाय अलर्ट’, रोह्यात नवीन पूल निकामी ?

Share Now

1,568 Views

रायगड (प्रतिनिधी) शुक्रवारी रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने सबंध रायगडला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसाने सावित्री, आंबा, कुंडलिका नदीला पूर आले. पुराचे पाणी जिल्हातील अनेक शहरांच्या वस्तीत शिरल्याने नागरिकांची त्रेधात्रिपाट झाली. महाड शहरात अभूतपूर्व पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. पाली, वाकण, खोपोली रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई गोवा महामार्गही ठप्प झाले, कोलाड, माणगांव रेल्वे पटरीत पाणी तुंबल्याने मांडवी एक्सप्रेस रोहा स्थानकात थांबवली. दुसरीकडे रोहा कुंडलिकेने धोक्याची पातळी ओलांडल्याने एकाच हाहा:कार उडाला. अष्टमी, वरसे नदीकाठच्या वस्तीत पाणी शिरले. जून्या अष्टमी पूलावरून पाणी जाऊ लागल्याने पलिकडील गावांचा संपर्क तुटला. नवीन पूलाच्या दोन्हीबाजूने पाणी वाहू लागल्याने मध्य भागातील उंचवटा अक्षरशः निकामी ठरल्याचे समोर आले. त्यामुळे नवीन पुलाचे उपयोग काय ? असा संताप रोहेकरांनी व्यक्त केला. दरम्यान, कुंडलिका संवर्धनाचा फटका वरसे, रोठ गावाला बसल्याचे उघड झाल्याने हेच का रोहा शहराचे विकास संवर्धन ? असा सवाल उपस्थित झाला आहे.

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. दोनचार दिवसापूर्वीच लावणी पूर्ण झाल्याने रोप वाहून गेल्याची भिती व्यक्त झाली. तर शुक्रवारी रात्रौच्या मुसळधार पावसाने सर्वत्र चक्काजाम केला. संपूर्ण नागरी जीवन विस्कळीत झाले. महाड शहरात पुराचे पाणी शिरले. त्यामुळे महाडकरांना २००५ च्या पूराच्या आठवणींने सतर्क केले. नागोठणे, पाली वस्तीत पाणी शिरल्याचे वृत्त आहे. आंबा नदीने रोद्ररूप धारण केल्याने वाकण, पाली, खोपोली मार्ग बंद झाले. रोहा तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. वरसे, रोठ, अष्टमीत पाणी शिरले. अष्टमी वस्तीत पाणी शिरल्याने अनेक नागरिकांचे मोठे नुकसान झाले. नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने हाल बेहाल झाले. अष्टमी पूलावर रात्रौ उशिरापासून पाणी राहिल्याने कामगार, एस.टी. पलिकडे अडकून राहीले. कामगारांना घरी व कामावर जाता आले नाही. शनिवारी बहुतेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

पावसाचे हाय अलर्ट विचारात घेता प्रशासनाने दक्षतेचा ईशारा दिला. प्रांताधिकारी रविंद्र बोंबले, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, तालुकाप्रमुख समीर शेडगे, शहरप्रमुख दिपक तेंडुलकर, मिलिंद पिंपळे, समीक्षा बामणे व नगरसेवक, पोलीस, महसूल प्रशासन अधिकाऱ्यांनी नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या. कुंडलिकेची पाण्याची पातळी कमी न होण्याची शक्यता विचारात घेत नागरिकांनी काळजी घ्यावी, संकटसमयी संपर्क करावे असे आवाहन प्रशासनाने केले. दरम्यान, कुंडलिकेच्या संवर्धनसाठी दोन्ही बाजूने कठडे बांधले. त्याचाच फटका पाणी मागे फिरून वरसे, रोठ वस्तीला बसल्याचे समोर आल्याने हेच का संवर्धन ? अशी स्पष्ट नाराजी नागरिकांनी व्यक्त केली, तर अष्टमी पूलावरील लोकार्पण न केलेले नवीन पूलाच्या दोन्ही बाजूने पाणी तुंबल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे नवीन पूल निकामी ठरला, त्यातून हेच का शहराचे नियोजन ? असा सवाल उपस्थित झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *