कालव्याचे पाणी पेटणार ? पाण्यासाठी विभागीय ग्रामस्थ प्रचंड आक्रमक, अल्टीमेटम देत ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा, पाणी तुम्ही बंद केलेत, तुम्हीच पाणी सोडा, एकच एल्गार

Share Now

649 Views

रोहा (राजेंद्र जाधव) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी किल्ला ते निवीपर्यंतच्या कालव्याला तब्बल आठदहा वर्षांपासून पाणी नाही. आम्हाला कालव्याचे काम करण्यासाठी एकदोन वर्षे द्या, नंतर कालव्याला पूर्वापार पाणी सोडले जाईल अशी सबब पाटबंधारे प्रशासनाने दिली होती. मात्र आज आठदहा वर्षे होऊनही कालव्याला पाणी सोडले जात नाही. त्यामुळे वाशी, लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीत ऐन उन्हाळ्यात वाळवंटाचे रुपडे येत आहे. कालव्याला पाणी नसल्याने भातशेती इतिहास जमा केली. दुसरीकडे पोल्ट्री, भाजीपाला व्यवसायिक अक्षरशः रडकुंडीला येतात. गुरेढोरे पशू पाण्यासाठी झगड़तात. मोठमोठ्या झाडांनी माना टाकल्या, हे भयान दृश्य प्रशासनाला कधीच दिसत नाही. कालव्याला पाणी आणण्याचे सलग पाचसहा वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र बडया लोकप्रतिनिधींची कालव्याला पाणी देण्याबाबत इच्छाशक्ती नसल्याने नकारघंटा वाजविली जाते. याच भयान वास्तवात कालव्याच्या पाण्याची गरज पाहता आम्हाला पूर्वापारसारखे डिसेंबर अखेर कालव्याला पाणी सोडा, कालव्याचे पाणी आमच्या हक्काचे आहे, कालव्याचे पाणी तुम्ही बंद केलेत, आता पाणी तुम्ही सोडा, कालव्याची साफसफाई, दुरुस्ती युद्धपातळीवर करा, यावर्षी कालव्याला पाणी घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. प्रसंगी कालव्याच्या पाण्यासाठी आंदोलन उभे करू असा गर्भित ईशारा पाटबंधारे प्रशासनाला देत वाशी, तळाघर विभागीय ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाल्याचे रविवारी समोर आले. दरम्यान, कालव्याच्या पाण्याबाबत विभागीय ग्रामस्थांनी एल्गार केल्याने पाणी पेटणार ? असे गरम वातावरण तयार झाल्याने पाटबंधारे प्रशासन पाण्याबाबत नेमकी काय भूमिका स्पष्ट करतो, त्यावर विभागीय ग्रामस्थ आंदोलनात्मक काय पवित्रा घेतात ? हे लवकरच समोर येणार आहे.

कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी वाशी ते निवी कालव्याच्या पाणी प्रश्नावर रविवारी सायंकाळी महादेव मंदिरात पाणी समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. त्या बैठकीला सुरेश मगर, विठ्ठल मोरे, अमित मोहिते, राजेंद्र जाधव, अरविंद मगर, संतोष माने, मारुती फाटक, संदेश मोरे, तुकाराम भगत, संजय भगत, प्रशांत राऊत, परशुराम भगत, रामचंद्र नाकती, राकेश बामुगडे, समीर बामुगडे, नंदकुमार बामुगडे, दीपक कलम्बे, सागर भगत यांसह ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. प्रारंभी राजेंद्र जाधव यांनी कालव्याच्या पाणी संदर्भातील अडचणी, पाण्याबाबतच्या प्रयत्नांचा आढावा घेतला. विभागाला मागील अनेक वर्षापासून पाणी सोडले जात नाही, त्यामुळे विभागात ऐन उन्हाळ्यात दुष्काळजन्य स्थिती पाहायला मिळते, हे प्रशासन अधिकाऱ्यांना का दिसत नाही, कालवा सफाई व दुरुस्तीची कारणे किती वर्षे सांगत आलेत. अजून दुरुस्ती का होत नाही. कालवा दुरुस्ती व तक्रारी निवारण करणे हे पाटबंधारे प्रशासनाचे काम आहे. आम्हाला डिसेंबर अखेर कालव्याचे पाणी हवेच, पाणी आमच्या हक्काचे आहे. आमचा पाणी तुम्हीच चोरून बाहेरील कंपनी व इतरांना दिलात अशी आक्रमक भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. कालव्याचे पाणी दुरुस्तीच्या नावाखाली पाटबंधारे प्रशासनाने बंद केले, प्रशासनाने नको तिथे मोऱ्या बांधल्या, करोडो रुपये खर्च करून डावा तीर यांसह चिल्हे, देवकान्हे उजव्या तीर कालव्याचे काँक्रिटीकरण केले. दुसऱ्याच पावसाळ्यात काँक्रेट वाहून गेले, त्या कामात करोडोंचा भ्रष्टाचार झाला, याला जबाबदार कोण ? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला, तर आमच्या संपूर्ण विभागाला कालव्याचे पाणी अत्यंत गरजेचे आहे, आमच्या हक्काचे पाणी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आमच्या संपादीत जमिनी परत द्या, याच आक्रमक चर्चेत पाणी समन्वय समितीचे शिष्टमंडळे लवकरच कोलाड पाटबंधारेच्या नव्या मुख्य कार्य. अभियंता दिपश्री राजभोज यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसे ग्रामस्थांनी एकमुखाने बैठकीत ठरविले. तर किल्ला, वाशी, रोठ, तळाघर वरसे ग्रामपंचायतीचे कालवा मागणी पत्र पाटबंधारे प्रशासनाला देण्यात येणार आहे.

कालव्याचे पाणी तुम्ही बंद केलेत, पाणी तुम्हीच सोडले पाहिजेत. कालव्याला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन न दिल्यास येता पंधरवड्यात विभागातील शेकडो महिला, ग्रामस्थ, तरुणांचा मोर्चा संबधीत प्रशासनावर धडकेल असा निर्धार उपस्थित ग्रामस्थ यांनी व्यक्त केला. कालव्याच्या पाण्यासाठी गावागावात सह्या मोहीम, बैठकांचे आयोजन करण्याचा ठराव पारीत करण्यात आला. कालव्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ, तरुण प्रचंड आक्रमक झाले. कालवा साफसफाई व दुरुस्ती करण्याला पाटबंधारे प्रशासनाने तातडीने प्रारंभ करावा, कालव्याचे पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे, स्थानिक तहसील प्रशासन यांसह पालकमंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात येईल. प्रशासनाला पंधरा दिवसाचे अल्टीमेटम देण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. कालव्याच्या पाण्यासाठी उपस्थित ग्रामस्थ प्रचंड आक्रमक झाल्याने पाटबंधारे प्रशासन आता तातडीने काय लेखी आश्वासन देतो, त्यावर वाशी, तळावर विभागातील ग्रामस्थ काय भूमिका घेतात ? याकडे सबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे कालव्याच्या पाण्यासाठी डावा तीरावरील ग्रामस्थ आक्रमक झाल्याचे समजतात उजव्या तीरावरील चिल्हे, देवकान्हे ग्रामस्थही कालव्याच्या पाण्यासाठी आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट सुतोवाच मिळाले. दरम्यान, डावा, उजवा तीर कालव्याचे पाणी बंद करून तालुका बाहेरील कंपन्यांना करोडोंचे पाणी विकणाऱ्या धनधाडग्यांच्या राफटींग, फार्मला पाणी देत भूमिपूत्रांचे पाणी चोरणाऱ्या पाटबंधारे प्रशासनाचा निषेध आता चोहोबाजूने होत आहे. त्यामुळे आता कालव्याचा पाणी पेटणार ? हे अधिक स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *