महिला ही घराचा केंद्रबिंदू:-डॉ. किरण पाटील

Share Now

256 Views

अलिबाग (अमूलकुमार जैन) महिला ही घराचा केंद्रबिंदू असते,हे लक्षात घेऊन महिलांच्या आरोग्याच्या सुरक्षितेसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद गवई,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कटारे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर,कार्यक्रमाचे नोडल आॅफीसर बालरोगतज्ज्ञ वर्ग १ डॉ. रोकडे,पॅथोलाॅजीस्ट डॉ. शीतल जोशी ,मेट्रन अनिता भोपी,असिस्टंट मेट्रन सीमा पाटील,नर्सींग आॅफीसर गायत्री म्हात्रेउपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले की,यंदाच्या नवरात्रोत्सवामध्ये महिलाआरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. यानिमित्ताने राज्यातील १८ वर्षांवरील युवती, गरोदर महिला, मातांची तपासणी करण्यात येणार आहे. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अशी संकल्पना घेवून विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या सर्व युवती, गरोदर महिला आणि मातांची आरोग्य तपासणी करून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. २६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होतील. रोज सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान ही शिबिरे होतील.ही मोहिम राबवण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये महिलांना गंभीर आजार असल्याचे आढळून आल्यास त्यांना संदर्भसेवेसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले जाणार आहे. तसेच स्थानिक पातळीवरही आजारी महिलांवर उपचार केले जाणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत हे आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे. याशिवाय मानव विकास मिशनअंतर्गत जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेतली जाणार असून त्यामध्ये विशेष तज्ज्ञांमार्फत आरोग्य तपासणीचे नियोजन केले जाणार आहे. तसेच गावपातळीवर अंगणवाडी केंद्रांमधूनही महिलांची तपासणी केली जाणार असून त्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे. नवरात्र उत्सव काळात या अभियानात आरोग्य विभागाबरोबरच महानगरपालिका, आदीवासी विकास प्रकल्प,महिला व व बालकल्याण विभाग,शालेय शिक्षण विभाग ग्रामविकास विभाग यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. वैद्यकीय अधिकारी स्वत तपासणी करतील. आजारी महिलांना उपचार व आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भित करण्यात येईल.उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीरे घेण्यात येणार आहेत.ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासणी करावयाची असून या कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिरे घेण्यात येणार आहेत.भरारी पथकाच्या माध्यमातून १८ वर्षांवरील युवती व महिलांची आरोग्य तपासणी केली जाईल.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकानेही शाळांमध्ये आरोग्य तपासणी करावयाची आहे.या दरम्यान नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे.असे पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितले की,या अभियानात ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये १८ वर्षांवरील तरुणी व महिलांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत आयोजित तपासणी शिबिरात महिलांची वजन, उंची घेतली जाणार असून त्यांची रक्त तपासणीदेखील केली जाणार आहे. माता व बालकांचे लसीकरणही यामध्ये केले जाईल. तसेच विशेष तज्ज्ञांमार्फत शिबिरात अतिजोखमीच्या मातांची तपासणी, बालकांची तपासणी व लसीकरण, सोनोग्राफी, रक्तगट व तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तपासणी केली जाणार आहे.

आरोग्य विभागातर्फे राज्यभर शिबिरांचे आयोजन औषधोपचाराच्या सुविधा या वेळी प्रत्येक आजारी महिलेवर औषधोपचार केले जाणार आहेत. यामध्ये महिलांना कॅल्शियम, फोलिक ॲसिड, लोहयुक्त इंजेक्शन तसेच इतर आवश्यकतेनुसार औषधोपचार केले जाणार आहेत. तर पोषण, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती यावर समुपदेशनही केले जाणार आहे.असे डॉ. माने यांनी सांगितले. आभार प्रदर्शन करताना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद गवई यांनी आवाहन केले की या उपक्रमात शासकीय रुग्णालय स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची वैद्यकीय अधिकारी तपासणी करतील. आजारी महिलांना आवश्यकतेनुसार उपचार देतील. तसेच, प्रत्येक रुग्णालय झोन अंतर्गत तपासणी शिबिरे घेण्यात येणार असून, आजारी माता व महिलांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात येईल. नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार असून सोनोग्राफी तपासणी आणि कुटुंब कल्याण बाबत समुपदेशन करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

(नवविवाहितांवर राहणार विशेष लक्ष राज्यात नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष राहणार आहे. त्यांच्या याद्या आशा कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असून या महिलांना गर्भधारणापूर्व काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय सोनोग्राफी शिबिर घेऊन गरोदर महिलांची सोनोग्राफी केली जाणार आहे.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *