वरसे ग्रा.पं.ची ग्रामसभा रस्ते, पाणी, अड़थळे विविध मुद्यांनी गाजली, तरुणांत मोठी जागृकता ! ग्रामस्थांच्या सहभागातून पुढील योजना होणार कार्यान्वित

Share Now

709 Views

रोहा (राजेंद्र जाधव) तालुक्यातील सर्वाधिक मोठ्या वरसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा गरमागरम वातावरणात गुरुवारी पार पडली. धोकादायक काही निकृष्ट रस्ते, बहुचर्चित पाणी योजना, झोपडपट्टी रस्ता अडथळा, डंपिंग ग्राउंड, कचरा यांसह ग्रामसभेत नेहमीच उपस्थित झालेल्या विषयांची अंमलबजावणी विविध मुद्यांवर सभा ऐतिहासिक गाजली. दुसरीकडे प्लास्टिक मुक्ती, स्वच्छता मोहीम मुख्यतः विधवा प्रथा कायद्यावर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी कोरम अभावी रद्द करण्यात आलेली ग्रामसभा गुरुवारी घेण्यात आली. या सभेला निवी, भुवनेश्वर, वरसे गावातील नागरिक, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, काही ठेकेदार रस्ते, पाणी योजनांची कामे दर्जेदार करीत नाहीत, त्या ठेकेदारांना कामे देण्यात येऊ नयेत यावर प्रचंड खडाजंगी झाली. अखेर कामांसाठी ठेकेदार नेमणूक झाल्यानंतर त्यांनी दर्जेदार कामे करावीत यासाठी आपण सर्वांच्या सहभागातून पुढील सर्वकश योजना कार्यान्वित करण्यात येतील असे स्पष्ट आश्वासन ग्रामसभेत देण्यात आले, तर सुक्याओल्या कचऱ्यावर अद्ययावत प्रक्रिया यंत्रणा लवकरच सुरू होईल, त्या कचऱ्यातून खताची निर्मिती होईल, कोणतेच प्रदूषण होणार नाही, अशी स्पष्टोक्ती ग्रामसभेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी भुवनेश्वर ग्रामस्थ परिसराला दिले आहे.

विविध विकासकामांसाठी सर्वाधीक निधी मिळविण्यात अग्रेसर असलेल्या, मात्र निधीचा योग्य वापर करण्यात अंशतः मागास म्हणून चर्चेत आलेल्या वरसे ग्रा.पं.तीने आता विविध समस्यांची झटपट सोडवणूक, विकासकामे दर्जेदार करण्याचा ग्रामसभेत संकल्प केला. त्याचदृष्टीने ग्रामसभेत विविध मुद्यांवर साधकबाधक तितकीच आक्रमक चर्चा झाली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी मधुकर मधुकर पाटील होते. यावेळी सरपंच नरेश पाटील, उपसरपंच मृणाली शिवलकर, अमित मोहिते, रामा म्हात्रे, ग्रामसेवक अशोक गुट्टे यांसह सदस्य, ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाखो रुपये खर्च करूनही अंतर्गत रस्ते लगेचच उखडतात, अनेक वस्तीतील ग्रामस्थांना नव्या रस्त्यांचे उपभोग फारसे मिळत नाही. याबाबत वारंवार तक्रारी झाल्या. संबंधीत अभियंता नीट लक्ष देत नाहीत, त्यांच्यावर अंकुश ठेवले जात नाही. पर्यायाने रस्ते खराब होतात, असा आक्षेप ग्रामस्थ व तरुणांनी घेतला. तर करोडो रुपयांची पाणी योजनेचे काम काही ठिकाणी अर्धवट ठेवले. कामाचा दर्जा घसरला, त्या ठेकेदारांना कामे मिळू नयेत, या मुद्यावर ठेकेदारी प्रक्रिया ऑनलाईन असते. तरीही संबंधीत ठेकेदारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वांचा सहभाग घेऊ या असा सकारात्मक मध्य मार्ग मधुकर पाटील यांनी काढल्याने ग्रामस्थ शांत झाले. भुवनेश्वर येथील डम्पिंग ग्राउंडचा विषय प्रचंड गाजला. लवकरच कचऱ्यावर प्रक्रिया यंत्रणा उभारली जात आहे. त्यामुळे प्रदूषण समस्या कायमची मिटेल असे मधुकर पाटील यांनी संतप्त ग्रामस्थांना आश्वासित केले.

वरसे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत झोपडपट्टी रस्ता अडथळा मुद्दा प्रचंड गाजला. झोपडपट्टीतील काही लोक रस्त्याच्या दुतर्फा हातगाडी, बांधकाम साहित्य ठेवतात. काहीजण रस्ता उखडत असतात. त्यामुळे भुवनेश्वर, निवी, तळाघर, लांढर गावातील ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना प्रचंड त्रास होता. हा मुद्दा सर्वांनी उचलून धरला. त्यावर संबधीत ग्रामस्थांना बोलावून समज दिली जाईल असे सरपंच नरेश पाटील यांनी सांगितले. ग्रामसभेत विधवा प्रथा कायदा लागू करण्यावरही परिणामकारक चर्चा झाली. याशिवाय नवीन रस्ते, गटारे, रोजगार हमी योजनेतील कामे, पाणी योजना यासंबधी ठराव घेण्यात आला. ग्रामसभेत आक्रमकपणे अनेक मुद्दे उपस्थित झाले. त्या मुद्यांना उत्तरे देत नवा बदल घडून आणण्याचा संकल्प ग्रामसभा मुख्यतः वरसे ग्रामपंचायतीने केला आहे. ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी मनोहर सकपाळ, उपाध्यक्षपदी योगेश राऊत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ग्रामसभेतील हक्क, अधिकाराबाबत ग्रामस्थ मुख्यतः तरुणांत मोठी जागृकतता आली आहे. ग्रामस्थ, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, ग्रामसभेतील विविध विषय, त्याबाबत घेतलेल्या ठरावाची ग्रामपंचायत आतातरी कितपत अंमलबजावणी करते ? हे लवकरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *