विनयभंग प्रकरणी रावे येथील एकास अटक, 7 वर्षीय मुलीचा केला विनयभंग, आरोपीस 11 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी.

Share Now

469 Views

पेण (प्रतिनिधी) : पेण तालुक्यातील रावे गावातील 7 वर्षीय मुलगी दांडिया निमित्त होममिनिस्टर बघण्यासाठी गावात गेली असता त्याच गावातील रमेश मारुती पाटील रा. रावे याने विनयभंग केल्या प्रकरणी दादर सागरी पोलीस स्टेशनला पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस अलिबाग सत्र न्यायालयात हजर केला असता 11 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

घटनेचे सविस्तर वृत्त असे की, रावे गावातील रायबादेवीच्या प्रांगणात नवरात्रोत्सवानिमित्त होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम पाहण्यासाठी याच गावातील 7 वर्षीय मुलगी तिच्या आई व बहिणीसोबत गेली असता तिथे उपस्थित असलेल्या रमेश मारुती पाटील रा. रावे यांनी सदर मुलीला मांडीवर घेऊन गर्दीचा फायदा उचलत बाजूला जाऊन अंगलट करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचवेळाने जेवणाची वेळ झाल्याने आई मुलीला शोधत गेली असता रमेश पाटील हा आड बाजूला आपल्या मुलीबरोबर अंगलट करत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यावेळी आईने आपल्या मुलीला तात्काळ खेचून जवळ घेतली. बोंबाबोंब होण्या अगोदरच सदर आरोपी रमेश मारुती पाटील आपले कपडे व्यवस्थित करून तेथून पळ काढला. मुलीच्या आईने सदर घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगून दादर सागरी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली.

सदर प्रकरणी रमेश मारुती पाटील या आरोपीवर भादवी कलम 354, पोक्सो अंतर्गत बालकाचे लैगिक अत्याचारापासून संरक्षण अधि. 8,12 नुसार गुन्हा दाखल करत अटक करून अलिबाग न्यायालयात हजर केले असता 11 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक के. आर. भऊड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *