रोहा राष्ट्रवादीला भाजपा देणार झटका ? भाजपात जाण्यासाठी अनेकजण इच्छुक असल्याचे संकेत, तर्कविर्तकाला उधाण

Share Now

915 Views

रोहा :(राजेंद्र जाधव) राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या बड्या भारतीय जनता पार्टीत जाण्यासाठी जिल्ह्यातील विविध पक्षांचे मुख्यत: राष्ट्रवादीचे पदाधिकारी इच्छुक असल्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. जिल्हा राष्ट्रवादीचे ताकदीचे ज्येष्ठनेते, माजी अध्यक्ष वसंतराव ओसवाल यांच्या कन्या, राष्ट्रवादीच्या माजी अध्यक्षा, पाली नगराध्यक्षा गीता पारलेचा हया भाजपाच्या वाटेवर असल्याच्या खात्रीशीर वृत्तानंतर रोहा राष्ट्रवादीलाही भाजपा जोरदार झटका देण्याच्या तयारीत असल्याचे अधिकृत वृत्त आहे. कोलाड विभागातील राष्ट्रवादीचे काही बडे नेते, नगरसेवक भाजपात जाण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत सलाम रायगडला मिळाले आहेत. ताकदीच्या माजी महिला नगरसेविकेलाही भाजपात येण्यासाठी विचारणा झाली आहे, त्यावर वेट अँड वॉच अशा भूमिकेत काही पदाधिकारी असल्याचे भाजपाच्या बडया नेत्याने सांगितले. रोहा राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार ? या पुन्हा नव्या वृत्ताने रोहा राजकारणात तर्कविर्तकाला मोठे उधाण आले आहे. दरम्यान, नव्याने भाजपात रुळत असलेले माजी आ. अवधूत तटकरे हे भाजपा संघटनात्मक दृष्टीने जबरदस्त महत्वकांक्षी झालेत, त्यामुळे अनेकजण भाजपात येण्याच्या वृत्ताला रविवारी अधिक बळ मिळाले. मात्र राष्ट्रवादीचे कोण नेते, कोण ते नगरसेवक भाजपात जाण्यासाठी इच्छुक आहेत, हे अधिकृत समोर आले नसले तरी काही पदाधिकाऱ्यांच्या भाजपा प्रवेशासाठी नावांची चर्चा जोरात सुरू आहे, तर राष्ट्रवादीचा कोणीही पदाधिकारी भाजपात जाण्याचे वृत्त नाही, चर्चेत निव्वळ कागांवा आहे, असे अप्रत्यक्ष राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

राजकारणात सत्तेसोबत जाणे हे आजकाल नैतिकता झाले आहे. सत्तेतील सहभागी शिंदे गटही रोहा शहर, तालुक्यात चांगलाच फोफावत आहे. अनेकजण शिंदे गटात सहभागी होत आहे. त्यामुळे मूळ ठाकरे शिवसेना शिंदे गटाच्या सत्तेत कितपत तग धरते ? याची चर्चा असतानाच जिल्हा राष्ट्रवादीला शनिवारी पालीत चांगला झटका बसला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे पदभार स्वीकारलेले वसंतराव ओसवाल यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा, नगराध्यक्षा गीता पारलेचा यांनी भाजपा जाण्याचा निर्णय जाहीर केला. त्याआधी कोलाड विभाग राष्ट्रवादीतील अनेक बुजुर्ग, तरुण नेतेगण शेकापत जाण्याचे संकेत मिळाले होते. अनेक पदाधिकारी राष्ट्रवादी सोडणार ? या सलाम रायगडच्या वृत्ताने जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नेत्यांनी समज घातली होती. आता पुन्हा ते नाराज नेतेगण भाजपाच्या वाटेवर असल्याच्या संकेताने नव्या चर्चेला उधाण आले. माजी आ अवधूत तटकरे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीतील नाराज नेत्यांना अधिक बळकटी मिळालेचे बोलले जात आहे. त्यातच काही नगरसेवक माजी आ. अवधूत तटकरेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चेने राजकारणात एकच खळबळ उडाली. तरीही कोण नगरसेवक संपर्कात आहेत, याबाबत तुफान चर्चा रविवारी दिवसभर सुरू होती. काही नगरसेवक भाजपात प्रवेश करतील ? या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र माजी जिल्हाध्यक्षा गीता पारलेचा यांचा भाजपा वाटेवर वृत्ताने रोहा राष्ट्रवादीतही चांगलीच हलचल माजली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीत खरोखर भूकंप होतो का ? हे लवकरच समोर येणार आहे.

राष्ट्रवादीतील बडे पदाधिकारी भाजपात आणण्यात आ रवींद्र पाटील, माजी आ अवधूत तटकरे कमालीचे सतर्क झालेत. ते राष्ट्रवादीतील नेतेगण, महिला पदाधिकारी यांच्या संपर्कात आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादीचे काही नाराज पदाधिकारी, महिला पदाधिकारी भाजपा नेत्यांच्या संपर्कात आल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. भाजपात जाण्यासाठी तळ्यात मळ्यात असलेल्या काही पदाधिकाऱ्यांना गीता पालरेचा भाजपाच्या वाटेवर वृत्ताने अधिकच ताकद मिळाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपाचे नवे नेते आ अवधूत तटकरे हे रोहा, श्रीवर्धन, तळा, माणगाव तालुक्यात भाजपा वाढविण्याच्या दृष्टीने अनेकांच्या संपर्कात जात आहेत. राष्ट्रवादीतील काहीजण भाजपात प्रवेश करतील, एकदाच धमाका करू, असे भाजपाकडून सांगण्यात आले. मात्र भाजपात रोहा राष्ट्रवादीचे ते कोण पदाधिकारी प्रवेश करतील, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे. तर राष्ट्रवादीचे कोणीही पदाधिकारी भाजपात जाणार नाहीत, प्रवेश वृत्ताला कोणताच दुजोरा नाही. अशातच रोहा राष्ट्रवादीत भूकंप होणार ? ह्या वृत्ताने रविवारी तर्कवितर्काला मोठे उधाण आले. दरम्यान, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सत्ताधारी राष्ट्रवादीत भूकंप होणार, असे स्पष्ट संकेत भाजपाने दिल्याने रोहा तालुका राजकारणात नेमकी काय उलथापालथ होते, आता राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी भाजपात प्रवेश करत माजी आ अवधूत तटकरेंच्या नेतृत्वाला खरोखर महत्त्व देतात का ? हे लवकरच आधोरेखीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *