चणेरातील महत्वकांक्षी म्हसाडी धरणाचा मार्ग मोकळा, प्रत्यक्ष प्रारंभ कधी ? सिंचन घोटाळ्याचा बसला होता फटका म्हसाडी धरणाचे उद्घाटन अधिकृत नसावे ; विचारे

Share Now

638 Views

रोहा (राजेंद्र जाधव) अलिबाग, रोहा राजकारण्यांच्या संघर्षात कायम मागास राहिलेल्या चणेरा विभागातील महत्त्वकांक्षी म्हसाडी धरण कामासाठीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे स्पष्ट संकेत पुन्हा प्राप्त झाले. याच म्हसाडी धरणाला तत्कालीन आघाडी सरकारच्या काळातील सिंचन घोटाळ्याचा मोठा फटका बसला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मोठा गाजावाजा करत धरणाच्या कामाचे उद्घाटन केले होते. म्हसाडी धरणाचे काम एफ ए कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. धरण कामासाठीच्या प्रारंभीसाठी एफ ए कंपनीचे तब्बल दोनतीन कोटी रुपये खर्च झाले. मात्र म्हसाडी धरणाला कोणतीच प्रशासकीय परवानगी नव्हती. तरीही घाईघाईत उद्घाटन करून ठेकेदाराने दोनतीन कोटी रुपये का खर्ची घातले ? हे अद्याप समोर आले नाही. अखेर सिंचन घोटाळ्यात म्हसाडी धरण अडकले, संबंधीत ठेकेदार बिल अदासाठी न्यायालयात गेला आणि धरणाचे काम रखडले, अशात म्हसाडी धरण अक्षरशः इतिहासात जमा झाले, धरण होणार कधी, याच प्रतीक्षेत आता म्हसाडी धरणाचा मार्ग अधिक मोकळा झाल्याचे वृत्त अप्रत्यक्ष समोर आल्याने चणेरावासियांच्या आशा अधिकच पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान, प्रस्तावित म्हसाडी धरणाच्या कामाला सुरुवात करा, असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने वर्षापूर्वीच दिले, त्या आदेशाचे पालन व्हावे, धरणाचे काम प्रत्यक्ष सुरू व्हावे यासाठी आता शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत अशी अधिकची माहिती कृती म्हसाडी धरण कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिली. तर धरण कृती समितीच्या प्रयत्नातून चणेरा विभागाला आता न्याय मिळणार असल्याची चर्चा संबंध विभागात सुरू आहे.

रोहा अलिबाग सीमा रेषेवर असलेला चणेरा विभाग आजही रोजगार व शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. भागाच्या विकासासाठी रोहा अलिबाग तालुक्यातील राजकारण्यांनी कधीच प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत. उलट दोन्ही तालुका राजकीय संघर्षात चणेरा विभाग अधिकच मागास राहिला. विभागातील अनेक तरुणांनी नोकरीसाठी मुंबईची वाट धरली. काहीजण वेठबिगर म्हणून मुंबईत वास्तवाला आहेत. याला जबाबदार रोहा, अलिबागचे लोकप्रतिनिधी आहेत. याच गलिच्छ राजकारणाचा फटका म्हसाडी धरण, नंतरच्या सिडको व बल्क पार्क प्रकल्पालाही बसला. प्रस्तावित बल्क प्रकल्पही माघारी गेले. भागात विविध प्रकल्प येण्यासाठी आधी म्हसाडी धरणाचा घाट घातला गेला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना म्हसाडी धरण कामाचे उद्घाटन २०११च्या दरम्यान केले. पण धरणासाठी एकही दगड चढले नाही. धरणाचे काम एफ ए कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. धरणाच्या प्रारंभी खर्चावर दोनतीन कोटी रुपये खर्च केले. अखेर कोणतीच परवानगी नसलेला म्हसाडी धरणाचे काम रखडले. संबंधीत ठेकेदार खर्च निधीसाठी कोर्टात गेला. धरणच नसल्याने प्रस्तावीत प्रकल्पांनाही दृष्ट लागली ही चर्चा असतानाच म्हसाडी धरण कृती समितीने धरणासाठी सतत पाठपुरावा केला. न्यायालयात अपील केले. धरण रखडण्याला लोक कारणीभूत नाहीत. आम्हाला पाण्यावाचून वंचित ठेवू नका, हे मुंबई हायकोर्टाच्या निर्दशनास वारंवार आणले. त्यावर मुंबई हायकोर्टाने प्रस्तावीत म्हसाडी धरणाच्या कामाला सुरुवात करा, असे आदेश कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला दिले, दुसरीकडे एसीबीनेही संबंधीत प्रकरण गुंडाळले, त्यामुळे म्हसाडी धरणाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिल्याने महत्त्वकांशी म्हसाडी धरणाचे काम लवकरच सुरू होणार ? हे अधोरेखीत झाले आहे.

चणेरा विभागात अनेक प्रकल्प वसणार, अशी चर्चा वर्षानुवर्षे सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याने नाकारलेला नाणार रिफायनरी प्रकल्प चणेरात होणार, असे केंद्र सरकारचे स्पष्ट सुतोवाच दिले होते. त्यानंतर सिडकोचे प्रकल्प उभे राहील, त्यापाठोपाठ बल्क पार्क प्रकल्पाची चर्चा झाली. मात्र अद्याप नेमके कोणते प्रकल्प चणेरात प्रस्तावीत होईल हे स्पष्ट झालेले नाही. तरीही चणेरा भागात बल्क पार्कचे प्रकल्प उभारण्याचे संकेत मिळत असतानाच विभागासाठीचे महत्वकांक्षी म्हसाडी धरणाचेही मार्ग मोकळे होणार असल्याच्या वृत्ताने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. म्हसाडी धरण कृती समितीच्या पाठपुराव्याला यश मिळणार आहे. मुंबई हायकोर्टाने म्हसाडी धरणाच्या कामाच्या प्रारंभीला हिरवा कंदील दिला. आता कोकण पाटबंधारे विकास महामंडळ प्रस्तावीत म्हसाडी धरणाच्या कामाला कधी प्रारंभ करतो ? याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. सिंचन घोटाळ्यात म्हसाडी धरण अडकले होते, ठेकेदार बिलासाठी न्यायालयात गेला होता, पण सर्वच प्रकरण गुंडाळून धरणाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सांगत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री सुनील तटकरेंनी म्हसाडी धरणाचे केलेले उद्घाटन अधिकृत नसावे अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष प्रकाश विचारेंनी दिल्याने यावर काय प्रतिक्रिया उमटते ? हे समोर येणार आहे. दरम्यान, प्रस्तावीत म्हसाडी धरणाचा मार्ग मोकळा झाला, हे अप्रत्यक्ष समोर आल्याने भविष्यात चणेरा विभागात नेमके कोणते प्रकल्प येतात, धरण कामाला नेमके कधी प्रारंभ होते ? हे पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *