रोहा (प्रतिनिधी) विविध बांधकामासंबंधी प्रशासनाचे दिवसेंदिवस कडक निर्बंध येत आहेत. सर्वच प्रशासन सतर्क झाले आहे, असे असतानाच रोहा नगरपरिषदेचे बांधकाम प्रशासन मात्र कायम झोपा काढत असल्याचे भयान वास्तव समोर आले. करोडो रुपये खर्च करून कुंडलिका नदीच्या काठावर सौंदर्यकरण होत असताना बायपास रस्तालगत पाचसहा महिन्यात चक्क पाचसहा अनाधिकृत भले मोठे गाळे बांधल्याची आश्चर्यकारक घटना पुन्हा एकदा चर्चेत आली. पाचसहा गाळे उभारले जातात, गाळा बांधकामाला न.पा बांधकाम विभागाची कोणतीच परवानगी नाही, ही धक्कादायक बाब बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती नसावीत, याच पुन्हा नव्या चर्चेत ते बांधकाम अनाधिकृत आहे, त्यासंबधीत मालकाला एमआरटीपी अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे, अनाधिकृत बांधकाम लवकरच पाडले जाईल असे ठोस आश्वासन रोहा अष्टमी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ धीरज चव्हाण यांनी दिले. दरम्यान, रोहा शहर बायपास रस्ता शेजारी, नदीच्या काठालगत बिनधास्त पाचसहा अनाधिकृत गाळे बांधण्यात आल्याने संबंधीतांना पाठबळ कोणाचे, गाळ्यांचे पद्धतशीर बांधकाम होईपर्यंत बांधकाम प्रशासनाचे अधिकारी होते कुठे, आता गाळे अनाधिकृत म्हणत नोटीस बजावली म्हणणारे मुख्याधिकारी धीरज चव्हाण नेमकी काय कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहा अष्टमी नगरपालिकेच्या हद्दीत दररोज अनाधिकृत बांधकामे, हातगाड्या थाटात उभ्या राहत आहेत. याकडे संबंधित प्रशासन सदोदीत लुटुपुटीची कारवाई करत आले. दुसरीकडे लोकपयोगी नसणाऱ्या योजनांवर करोडो रुपये खर्ची घालत आहे. यातील अंदाजे नऊ कोटी रुपये खर्चाची बहुचर्चित भुयारी गटार योजना अपेक्षितप्रमाणे निकामी ठरली. भुयारी गटार योजनेला भविष्य नाही, असा जोरदार आक्षेप पत्रकार व शिवसेनने घेतला होता. तरीही भुयारी गटार योजना रेटण्यात आली. अखेर भुयारी गटार योजना अर्धवट करून रिकामी झाली. पण ही भुयारी गटार योजना बाद केली का, करोडो रुपये गटारत का घालवले याचे शास्त्रीय कारण अद्याप प्रशासनाने दिले नाही ही बाब चर्चेत असतानाच प्रशासनाला वाढती अनाधिकृत बांधकामे रोखता आलेले नाहीत, त्यावर कुंडलिकाच्या काठालगत बायपास रस्त्यालगत नव्याने भलेमोठे पाचसहा गाळे अनाधिकृतपणे उभारण्यात आले. याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी झाल्या, तरीही धिम्म बांधकाम प्रशासन कारवाईसाठी जागृत झालेले नाही. यामुळे कुठेही कसेही वाढीव अनाधिकृत बांधकाम बांधावीत, असेच प्रताप मुख्यतः बड्यांचे सुरू आहे. मारुती मंदिर ते तीनबत्ती मुख्य मार्केटही दूतर्फा वाढीव बांधकामांनी गुदमरून गेला आहे. याकडे प्रशासन, न.पाचे तत्कालीन कारभारी, त्यांच्या नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, आता करोडो रुपये खर्चाच्या कुंडलिका काठावरील बायपास रस्त्यालगत वाढलेल्या अनाधिकृत गाळ्यांची भर पडल्याने नगरपरिषद प्रशासन करतो काय ? असाच सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, संबंधीत गाळ्याच्या जमीन मालकाला एमआरटीपीची अंतर्गत नोटीस बजावली आहे. जागेवरील अनाधिकृत बांधकाम हटविले जातील असे आश्वासन मुख्याधिकारी धीरज चव्हाण यांनी दिले आहे. तर महत्त्वाच्या रस्त्याशेजारी अनाधिकृत भलेमोठे गाळे उभे राहतात. हे प्रशासन अधिकाऱ्यांना कधीच दिसले नाहीत का, याच आश्चर्यात गाळे जमीन मालकाला बजावलेली नोटीस वरातीमागून घोडे नाचवणे असेच आहे असा खेद रोहेकरांकडून व्यक्त झाला आहे. आता त्या अधिकृत गाड्यांवर प्रशासन नेमकी काय कारवाई करतो ? हे लवकर समोर येणार आहेत.