धाटाव येथे ४८वी कुमार राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा, खो खो खेळाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न : अनिकेत तटकरे

Share Now

233 Views

रोहा (शशिकांत मोरे) देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो खो खेळाचा प्रचार आणि प्रसार करीत खो खोच्या खेळाबाबतची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रायगड खो खो असोसिएशनचे जिल्ह्याध्यक्ष आ. अनिकेत तटकरे यांनी केले. महाराष्ट्र खो खो असोसिएशनतर्फे देण्यात आलेल्या मान्यतेनुसार रोहा तालुक्यातील धाटाव येथील प पू पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयाच्या भव्य प्रांगणातील ८ ते ११ डिसेंबर रोजी स्व.नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर आयोजित ४८ व्या कुमार मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेच्या नियोजन दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र खो खो असो.चे उपाध्यक्ष विजय मोरे, शिक्षक अलंकार कोठेकर, तालुकाध्यक्षा प्रीतम पाटील, सचिव स्नेहा ताडकर, अनंत मगर,अमित मोहिते, सतीश भगत, अंकुश ताडकर यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आ.अनिकेत तटकरे म्हणाले की, शरद पवार यांच्या ८२व्या वर्षात वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खो खो खेळाबद्दल आकर्षण निर्माण व्हावे म्हणून जि.प.शाळांना निमंत्रित करणार आहोत. याठिकाणी २४ संघ मुलांचे व २४ संघ मुलींचे असून प्रत्येक संघात १५ खेळाडू असतील यात एकूण १२५ खेळाडू खेळतील, त्याचप्रमाणे पंच कमिटी, नियोजन समिती असेल. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन सत्रात या स्पर्धा होणार असून येणाऱ्या खेळाडूंची निवास व्यवस्था सुद्धा चोखपणे केली जाणार आहे. याठिकाणी ४ क्रीडांगण असून गॅलरीत अंदाजे २ हजार क्रीडा रसिक आनंद घेतील असे उत्तम नियोजन असेल. खो खो खेळ हा दोन चार गावापुरता मर्यादित न राहता जिल्हा, राज्यात पसरविण्याचे काम करणार आहोत आणि यातूनच जिल्ह्यातून चांगले संघ निर्माण होतील यासाठी प्रयत्न राहणार आहेत. याठिकाणी स्थानिक कलाकारांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याची चालना दिली जाईल.

धाटाव येथील पांडुरंगशास्त्री आठवले विद्यालयात ८ ते ११ डिसेंबर रोजी स्व. नथुरामभाऊ पाटील क्रीडांगणावर होणाऱ्या ४८ व्या कुमार राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेची जय्यत तयारी सुरू असून याठिकाणी उत्तम नियोजन आणि संयोजन करण्यात येत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्षसह तालुकाध्यक्ष यांसह सर्व पदाधिकारी विशेष मेहनत घेत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *