अलिबाग:(अमूलकुमार जैन) आरसीएफ थळ: दिनांक 02.12.2022: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड थळ आयोजित रायगड पोलिस आरोग्य शिबिराचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक (कोकण परिक्षेत्र) संजय मोहिते यांच्या शुभहस्ते आणि अनिरुद्ध खाडिलकर कार्यकारी संचालक (थळ) आरसीएफ यांच्या उपस्थितीत आज अलिबाग येथे जिल्हा पोलिस मुख्यालयात करण्यात आले.
पोलिस अधीक्षक रायगड – अलिबाग यांच्या सुचनेवरून पोलिस उप अधीक्षक (गृह) मुख्यालय अलिबाग यांनी केलेल्या विनंतीनुसार अलिबाग उप विभागातील अलिबाग, मांडवा सागरी, रेवदंडा आणि मुरुड ठाण्यातील ४० वर्षे वयावरील अधिकारी व अंमलदार यांच्या आरोग्य तपासणीसाठी आरसीएफ तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे २०० स्त्री – पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टर्स कडून या शिबिरात करण्यात येईल. यात रक्तदाब, रक्तशर्करा, बीएमआय, सीबीसी/एचबीए 1सी, लिपिड प्रोफाईल आणि नेत्रचिकित्सा या तपासण्याचा समावेश आहे.
कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र तत्पर असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेत कृतज्ञता व्यक्त करावी या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरसीएफ थळ तर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समयी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, आरसीएफचे मानव संपदा व प्रशासन मुख्य महा व्यवस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, अति. कार्य. उप विभागीय पोलिस अधिकारी जगदीश काकडे यांसह आरसीएफ व पोलिस अधिकारी उपस्थित होते.