विमलाबाई मेहेंदळे कन्या शाळा भाड्याने देण्याचा घाट, नगरसेविका समीक्षा बामणेंचे जोरदार आक्षेप

Share Now

1,011 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा अष्टमी नगरपरिषदेची शहरातील एकमेव असलेली विमलाबाई मेहेंदळे कन्या शाळा ही शहराची ओळख आहे. मेहेंदळे परिवाराने शहरातील व तत्कालीन परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातील मुलींना स्वतंत्र शिक्षण मिळावे या उद्दिष्टाने ही जागा देत या शाळेची उभारणी केली होती. आजवर अनेक मुलींनी या शाळेतून शिक्षण घेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय भरारी घेत आहेत. मात्र या शाळेकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे एकूण परिस्थितीवरुन दिसत आहे. आता ही शाळा 11 महिन्यांच्या अल्पमुदतीवर भाड्याने देण्याचा घाट प्रशासनाकडून घातला. यावर नगरपरिषदेमधील शिवसेनेच्या नगरसेविका समिक्षा बामणे यांनी जोरदार आक्षेप दर्शविला आहे. यासोबतच या ठिकाणी मुलिंना उच्च शिक्षण घेण्याची शहरातच संधी उपलब्ध व्हावे यासाठी याच शाळेमध्ये महाविद्यालय सुरु करण्यात यावे अशी मागणीही रोहा शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता यावर महिला पालकमंत्री असलेल्या आदिती तटकरे व खासदार सुनील तटकरे काय भूमिका घेतात याकडे सर्व रोहेकरांचे लक्ष लागले आहे.

रोहा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली आपली जागा मेहेंदळे कुटुंबीयांनी बक्षिसपात्र देत त्या ठिकाणी विमलाबाई मेहेंदळे कन्या शाळा सुरु करण्यात आली. सुरवातीस रायगड जिल्हा परिषद व त्यानंतर नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या कार्यकाळात या शाळेमध्ये आजपर्यंत हजारो सावित्रीच्या लेकी प्राथमिक शिक्षण घेत उच्च विद्याविभूषित झाल्या आहेत. आज शहरातील अन्य शाळा या सुस्थितीत पुर्ण विद्यार्थी संख्येने सुरु असताना प्रशासनाच्या संशयास्पद दुर्लक्षामुळे येथील विद्यार्थी संख्या कमी होत गेली. यामुळे आज हि शाळा बंद होण्याच्या मार्गावर आली आहे. अशी हि रोहा शहराची ओळख असणारी कन्या शाळा भाडेतत्वावर देण्याचा घाट रोहा नगरपरिषद प्रशासनाने घातला आहे.

त्याला शिवसेनेच्या नगरसेविका समीक्षा बामणे यांनी आपला विरोध दर्शविला आहे. आपला विरोध दर्शविणारे पत्र त्यांनी मुख्याधिकारी रोहा नगरपरिषद यांना दिले आहे. या विरोध पत्राचे वाचन पालिकेच्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये करावे अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली आहे. आज ही शाळेची इमारत ही सुस्थितीत आहे. त्यामुळे अन्य कोणासही हि भाडेतत्वावर देण्याऐवजी या ठिकाणी मुलींचे महाविद्यालय नगरपरिषद प्रशासनाने सुरु करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. फक्त मुलींच्या शिक्षणासाठी मेहेंदळे कुटुंबीयांनी हि शाळा उभी केली असल्यामुळे या ठिकाणी महिला सक्षमिकरणाच्या दृष्टीनेच उपक्रम राबवण्यात यावेत अशी सूचना त्यांनी आपल्या पत्राद्वारे प्रशासनाला केली आहे. रोहेकरांच्या अस्मितेच्या विषयाकडे खासदार सुनील तटकरे यांनीही लक्ष घालत या ठिकाणी महिलांचे महाविद्यालय उभे राहू शकते असा आशावाद हि त्यांनी आपल्या पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *