प्रतिष्ठेच्या दोन्ही रोठ ग्रामपंचायतीत काय परिवर्तन होणार ? उत्कंठा शिगेला , रोठ खुर्दमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी

Share Now

828 Views

रोहा (राजेंद्र जाधव) तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठित, श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या रोठ बुद्रुक, रोठ खुर्द ग्रामपंचायतीत काय परिवर्तन होणार, रोठ खुर्दमध्ये कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाल्याने नेहमीच स्वबळावर निवडून आलेल्या धाडसी युवा नेतृत्व दिनेश मोरे यावेळीही नव्या कॉंग्रेस राष्ट्रवादीला पुरुन उरतात का ? याचीच उत्कंठा कमालीची शिगेला पोहोचली. दुसरीकडे श्रीमंत रोठ बुद्रूकमध्ये सेना भाजपाने पारंपारिक युती कायम ठेवली. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी प्रस्थापितांना सेना भाजपाने अंशतः नामोहरण करून तीन सदस्य निवडून आणले होते. आता मुख्यतः सेनेने राष्ट्रवादी आघाडीला दुर ठेवत भाजपाशी जवळीक केली. त्यामुळे रोठ बुद्रूकमध्ये राष्ट्रवादीला कितपत फटका बसतो, सेना भाजपा युती सत्ता काबीज करते का ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

तालुक्यातील तब्बल 21 ग्रामपंचायतीच्या निवडणुका १५ जानेवारीला होत आहेत. त्यात वरसे, दोन्ही रोठ, तळाघर, वाशी, मालसई, धामणसई, एनघर यांसह अन्य महत्वाच्या ग्रामपंचायतीत लक्षवेधी लढत होत आहे. वरसेत सेना राष्ट्रवादीने आघाडी केली. ती आघाडी स्थानिक काही शिवसैनिकांना मान्य नाही. त्याच घडामोडीत केवळ एका जागेसाठी वरसे ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे स्वप्न अपुरे राहिले. तळाघर ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला बंडखोरांशी सामना करावा लागला. वाशीत मगर गटाने राष्ट्रवादीसमोर आव्हान उभे केले. याउलट सेनेने बहुतेक ग्रामपंचायतीत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. सेना राष्ट्रवादी आघाडीत बिघाडीचा फायदा तोटा कोणाला होतो ? याच चर्चेत दोन्ही रोठ ग्रामपंचायत राजकारणाकडे सर्वांचेच लक्ष लागले. त्यात रोठ खुर्दचे उपसरपंच जनार्दन मोरे, हरिश्चंद्र मोरे, सचिन मोरे यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादीची आघाडी केली. खा.सुनिल तटकरे यांची भेट घेऊन जेष्ठनेते भाईसाहेब पाशीलकर, तालुकाध्यक्ष विनोद पाशीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी विरोधी गट दिनेश मोरे यांच्या पॅनलसमोर उभे ठाकले. दिनेश मोरे यांनी नेहमीच स्वबळाची ताकद दाखविली. दिनेश मोरे यांच्या जनमत ताकदीला कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी यावेळी तरी रोखेल का, अशात आपण विकासकामांच्या बळावर पुन्हा सर्वच नउ जागा निवडून आणू , असा निर्धार नेते दिनेश मोरे यांनी व्यक्त केला. तर रोठ खुर्दमध्ये आता परिवर्तन निश्चित आहे, जनतेचा कौल कॉंग्रेस राष्ट्रवादीला मिळणार , असा दावा कॉंग्रेसचे सचिन मोरे यांनी केल्याने बदल होणार का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीत सेना राष्ट्रवादीत आघाडी होणार असे संकेत होते. तसे प्रयत्न मालसई, धामणसई व इतर ग्रामपंचायतीत झाले. मात्र राष्ट्रवादी सेनेला विश्वासात घेत नाही, याच भूमिकेतून वरसे वगळता इतरत्र सेनेने आघाडीला फाटा देत स्वबळावर निवडणूक लढविण्याचा नारा दिला. श्रीमंत रोठ बुद्रूकमध्ये सेना भाजपाने पारंपरिक युती कायम ठेवीत राष्ट्रवादीला शह देण्याचा पुन्हा विडा उचलला. मागील निवडणुकीत ७ जागांपैकी ३ जागा सेना भाजपाने मिळविल्या. आता भाजपाचे युवा नेतृत्व अमित घाग स्वतः सेनेचे नितीन वारंगेही मैदानात आहेत. सेना भाजपाचे खुद्द नेतेगण मैदानात उतरल्याने राष्ट्रवादीचे नेते ज्ञानेश्वर साळुंखे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात काय डावपेच आखतात, राष्ट्रवादी पारंपरिक सत्ता टिकवून ठेवते का ? हे पाहणे मजेशीर ठरणार आहे. सेना भाजपा युती रोठ बुद्रूकमध्ये पुन्हा कायम राहिल्याने नेमके कोणाला फायदा होतो ? याची प्रचंड उत्कंठा आहे. रोठ खुर्दमध्ये दिनेश मोरे यांनी तालुक्यातील बलाढ्य राष्ट्रवादीला कधीच शिरकाव करु दिले नाही, आता कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडी दिनेश मोरे गटाला कितपत झटका देते, तर दिनेश मोरे कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीला पुन्हा कितपत पुरुन उरतात ? हीच संबंध तालुक्याला उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *