माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला मोठे करण्यात पत्रकारांचे मोठे योगदान ;आ. भरतशेठ गोगावले

Share Now

841 Views

महाड (वार्ताहर) माझ्यासारख्या छोट्या व्यक्तीला मोठे करण्यात पत्रकारांचे खूप मोठे योगदान आहे. सत्त्यनिष्ठा या एकमेव निकषावर आधारित व्रतस्थ सेवाकर्माचे शिवधनुष्य पेलत अनेकदा पाणउतारा सहन करत आपले कर्तव्य चोखपणे बजावणाऱ्या पत्रकारांच्या निस्वार्थ सेवाकार्याचा सन्मान माझ्या हस्ते होत असल्याचा मला निश्चित अभिमान वाटत असल्याचे भावनिक उदगार आ. भरत गोगावले यांनी काढले.

महाड पत्रकार संघ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत व्यासपीठावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापक जमदाडे, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे व सचिव रोहित पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. 
त्यानंतर महाड क्रांती भूमीतील पत्रकार कै.रवींद्र पाटील, कै.ऍड. विजयसिंग जाधवराव,कै. डॉ. महंम्मद रफी पुरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

महाड व पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळ्यामध्ये पत्रकार चंद्रकांत कोकणे, गोपाळ कांबळे, श्रीकांत सहस्रबुद्धे, रवींद्र शिंदे, सुनील पाटकर, शैलेश पालकर व बबन शेलार यांचा आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला, तर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेले ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रेय कळमकर, दीपक शिंदे यांचा सन्मान महाड पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान केला. यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे यांनी आपले भाव व्यक्त करताना प्रत्येक टप्प्यावर पत्रकारिता बदलत गेली आहे. पत्रकारिता करताना जो तारेवरची कसरत करतो तोच कसरतपटू ठरतो. ते कौशल्य आहे म्हणून समाज त्याला स्वीकारतो, तर पत्रकार बबन शेलार यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की पत्रकारिता करणे म्हणजे फार मोठे धाडसाचे काम आहे, त्याचबरोबर मेहनत आणि चिकाटी हे गुण असतील तर पत्रकारिता करावी, तसेच ज्येष्ठ पत्रकार रवी शिंदे यांनी देखील आपल्या प्रदीर्घ पत्रकारितेतील अनुभव सांगताना महाड मधील शाम हॉटेल मध्ये मद्य विक्री परवाना मिळू नये यासाठी केलेले आंदोलन यामुळेच पत्रकारितेत आलो असल्याचा दाखला यावेळी उपस्थितांसमोर त्यांनी दिला.

दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना महाड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी आमदार भरत गोगावले यांना पत्रकारांसाठी विमा कवच मिळावा या संदर्भात मागणी केली, तर ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी पत्रकार सुरक्षा निधी संदर्भात मुद्दा उपस्थित करून महाराष्ट्र शासनाने या संदर्भात वेळीच पावले उचलून पत्रकारांना योग्य न्याय द्यावा अशी भूमिका मांडली, तर महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आजवरच्या पत्रकरितेच्या इतिहासात असे अनेक बदल समाजात, व्यवस्थेत घडून आले आहेत. फक्त बातम्या देवून पत्रकारांचे काम संपत नाही तर त्यापलीकडे जावून समाजात बदल, परिवर्तन घडवून आणावं लागतो अशी सर्वसमावेशक पत्रकारिता आज करणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी महाड पत्रकार संघाचे खजिनदार दीपक साळुंखे, कार्याध्यक्ष सिकंदर अनवारे, सहसचिव निलेश लोखंडे, प्रसिद्धीप्रमुख रघुनाथ भागवत, नितेश लोखंडे, राजेंद्र जय्यतपाल, सुधीर सोनार, उदय सावंत, योगेश भामरे, मनोज चेंडेकर आदी सदस्य व व त्यांचे परिवार देखील उपस्थित होते. शेवटी राजेंद्र जयपाल यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *