रोहा : (रविंद्र कान्हेकर) रोहा तालुक्यातील पाले बुद्रुक हे गाव डोंगराच्या कुशीत वसले आहे. डोंगर उतराच्या पायथ्यावरून कालवा वाहत असतो. मात्र पाले बुद्रुक व आंबेवाडी या दोन गावांना जोडणाऱ्या मोरीच्या बाजूला असणारा रस्ता पहिल्याच पावसात पूर्णपणे खचला असल्याने दोन्ही गावांना जोडणाऱ्या चारचाकी वाहनांची वाहतूक थांबली आहे. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने, कामगार यांना रात्रीच्या वेळी या मार्गांवरून जात असताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वयोवृद्ध व्यक्ती दोन वेळा या खड्ड्यात पडल्याचे वृत्त आहे.
हा रस्ता गेल्यावर्षी रस्त्याचा काही भाग वाहून गेल्यावर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळा महाबळे यांनी पाटबंधारे विभागाला ११ सप्टेंबर २०२३ रोजी पत्र दिले होते. मात्र या घटनेकडे गेली वर्षभर पाटबंधारे विभागाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. त्यामुळे शाळकरी मुले व कामगार यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मोरीच्या कडेला असलेला रस्ता खचून वाहून गेल्याने मोठी वाहने या रस्त्यावरून ये जा बंद करण्यात आली आहेत. पाऊस पडल्यावर पायी जातानाही या रस्त्यावरून पाणी वाहत असते. त्यामुळे दोन वेळा गुरे या पाण्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडळ्याच्या घटना घडल्या आहेत.
पाले गावाच्या हद्दीत असणाऱ्या डोंगर उतारावरचे पावसाचे संबंध पाणी या मुख्य मोरीवरून पुढे पाईपद्वारे पास होऊन कुंडलिका नदीला मिळत होते. मात्र आता मोरीच्या वरील भाग लीकेज असल्याने ही संपूर्ण मोरी धोकादायक बनली आहे. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेता पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर या रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंत बांधून ग्रामस्थांची ही समस्या दूर करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.