रोह्याचे पत्रकार मिलिंद अष्टीवकर मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष, गौरव रायगडचा

Share Now

65 Views

मुंबई (प्रतिनिधी) रोहा येथील पत्रकार मिलिंद अष्टीवकर हे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे नवे अध्यक्ष असतील.. १ सप्टेंबर रोजी ते अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतील. पुढील दोन वर्षे अष्टीवकर परिषदेचं नेतृत्व करणार आहेत. रायगडकडे परिषदेचे नेतृत्व दुसरयांदा येत आहे, यापुर्वी सुप्रिया पाटील परिषदेच्या अध्यक्ष होत्या. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या घटनेनुसार कार्याध्यक्ष हा दोन वर्षांनी अध्यक्ष होतो. अष्टीवकर २०२२ ते २०२४ या कालावधीत कार्याध्यक्ष होते. दर दोन वर्षांनी १ सप्टेंबर रोजी नवीन अध्यक्ष आपल्या पदाची सूत्रे हाती घेतात. मिलिंद अष्टीवकर हे अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे 45 वे अध्यक्ष असतील.

मिलिंद अष्टीवकर गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रीय आहेत. रायगड प्रेस क्लबचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव, परिषदेचे कोषाध्यक्ष आणि नंतर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे. कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. लोकमत, कृषीवल आणि अन्य दैनिकांसाठी ते काम करत. सामाजिक बांधिलकी जपणारा आणि चळवळीशी नातं सांगणारा कार्यकर्ता पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक सामाजिक चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व केलं. पत्रकारांच्या हक्कासाठीच्या लढ्यात ही त्यांचा सक्रीय सहभाग होता. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शन योजना आणि पत्रकारांवरील हल्लयाच्या विरोधात परिषदेने उभारलेल्या लढ्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. परिषदेचे नेते एस.एम. देशमुख यांनी मिलिंद अष्टीवकर यांचे अभिनंदन केले असून त्याच्या कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या आहेत. परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, मावळते अध्यक्ष शरद पाबळे यांनीही मिलिंद अष्टीवकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

परिषदेच्या विद्यमान कार्यकारिणीची उद्या मुदत संपत आहे. शरद पाबळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकारिणीने उल्लेखनीय कार्य केले आहे. या काळात परिषदेची सदस्य संख्येत लक्षणीय वाढ झाली असून तालुका आणि गाव पातळीपर्यंत शाखा विस्तार झाला आहे. या काळात पत्रकारांच्या हक्काचे विविध लढे लढले गेले, राज्यातील शेकडो पत्रकारांना मदत करण्याची भूमिका परिषदेने घेतली. परिषदेची चळवळ अधिक गतीमान केल्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी शरद पाबळे, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी आणि सर्व कार्यकारिणीला धन्यवाद दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *