रोहा (दीपक भगत) तसं पाहिलं तर रोहातील अनेक प्रश्न हे आता थट्टेचा विषय होऊ लागलेले आहेत. रोहातील अनेक नागरिकांनी रोहातील विविध प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठवलं परंतु फारसा काही फरक कोणाला पडताना दिसत नाही असच म्हणावं लागेल. आता हेच बघा ना…! रोहा मध्ये असलेला उपजिल्हा रुग्णालय नाव जरी उपजिल्हा रुग्णालय असला तरी परिस्थिती मात्र भीषण आहे. येथे काही महिन्यांपासून रक्तपेढी बंद आहे, रुग्णांची पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते तसेच इतरही असे अनेक प्रश्न असताना काही महिन्यापूर्वी नवनिर्वाचित खासदार झालेले, कार्यकर्त्यांकर्वी कोकणचे भाग्यविधाते म्हणविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आभार प्रदर्शनाच्या जाहीर सभेत सांगितलं होतं की, येत्या पंधरा दिवसांमध्ये रोहा तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटलचं काम सुरू होईल. पुढे या कामच काय झालं हे बऱ्याच रोहेकरांना माहित नाहीये, किंवा रोहेकर हे जाणून घेण्यात फारसा रस देखील नाही.होईल तेव्हा बघू परंतु जे रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय आहे तेथील अवस्था मात्र खूप भयानक आहे हे कधीतरी लोकप्रतिनिधीने पहाव.वारंवार अनेक पत्रकाराने रोहा उपजिल्हा रुग्णालयाबाबत अनेक समस्या आपल्या बातम्यांच्या माध्यमातून प्रसारित केलेल्या आहेत. परंतु त्याकडे सारासार दुर्लक्ष करायचं हा आता काही लोकप्रतिनिधींचा एक शिरस्ता झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.रोहा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात मागील काही महिन्यापासून रक्तपेढीची कमतरता आहे ती बंद पडल्यात जमा आहे.ही बातमी मागील काही महिन्यापूर्वी “सलाम रायगडसह” इतर स्थानिक वर्तमानपत्रात झळकली होती. नुकतीच दुसरी एक बातमी वर्तमानपत्रात बातमी आली की,तिथे पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. असे अनेक प्रश्न भेडसावत असताना या रोहात सुसज्ज हॉस्पिटल निर्माण केलं जाईल,त्याच काम अवघ्या पंधरा दिवसात केलं जाईल हे आपल्या भाषणात वारंवार सांगून रुग्णांची आणि रोहेकऱ्यांची जी काही क्रूर थट्टा चालवलेली आहे ती खरच निंदनीय आहे.
सुसज्ज हॉस्पिटल कधी होईल तेव्हा होईल परंतु उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे नाही त्याची उपलब्धता करून रुग्णांना दिलासा मिळावी हीच माफक अपेक्षा आज तमाम रोहेकरांची आणि रुग्णांची झालेले आहे. नुकताच रोहामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे काही जणांना सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे सोयीचे होणार आहे त्यामुळे रोहा उपजिल्हा रुग्णालयातील पायाभूत सुविधा कशा निर्माण होतील याकडे लोकप्रतिनिधी आणि रुग्णालय प्रशासनाने भर द्यावा. रुग्णाच्या वाटेला आलेली ही घोर प्रतारणा आता तरी लोकप्रतिनिधींनी किंवा प्रशासनाने थांबवावी अशी मागणी आता नागरिक करू लागलेले आहेत. त्या पंधरा दिवसांचं काय झालं ? हे कोणाला आता काही विचारायची गरज नागरिकांना नाही. सुसज्ज हॉस्पिटलच दिवास्वप्न सत्यात उतरेल तेव्हा त्यावर नक्की रोहेकार चर्चा करतीलच. परंतु सध्यातरी रोहा आणि सुसज्ज हॉस्पिटल हे समीकरण लवकर सत्यात उतरण्याची आशा धुसर आहे. त्याच्यावर वारंवार चर्चा करण्यात पण रोहेकरांचा फारसा रस राहिलेला नाहीये असच आता म्हणावं लागेल.