रोहा (प्रतिनिधी) उशिरा माघारी जात असलेल्या परतीच्या पावसाचे तांडव बळीराजाच्या अक्षरशः जीवावर उठलेला आहे. सलग आठवडाभर धुमाकूळ घातलेल्या पावसाने उभ्या भातशेतीला पाण्यात लोळविले. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला सोन्याचा घास पूर्णतः अवकाळी पाऊस हिसकावून घेतो की काय ? अशी भयाण परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील सर्वच भाग यांसह रोहा तालुक्यातील भातशेतीची प्रचंड दशा झालेली आहे.आधीच रान डुक्कराने दररोज मांडलेल्या उच्छाद आणि आता प्रत्यक्षात पावसाने बळीराजाला संकट टाकले. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानीचे सरसकट पंचनामे करावे, भातशेतीची तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी बळीराजा फाउंडेशन केली आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याबाबतचे निवेदन सोमवारी तहसीलदार रोहा, कृषी विभाग रोहा प्रशासनाला दिले. दरम्यान तहसीलदार किशोर देशमुख यांना बळीराजा फाउंडेशनचे संस्थापक राजेंद्र जाधव यांनी भातशेती नुकसान पंचनाम्याबाबत स्पष्ट विचारणा केली. पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले का ? यावर काही ठिकाणच्या भातशेतीचे पंचनामे सुरू आहेत. कृषी अधिकारी महादेव करे यांनाही तसे निर्देश दिल्याचे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले तर बळीराजा फाउंडेशनच्या आक्रमक इशाराची दखल घेत कृषी अधिकारी महादेव करे यांनी आधीच तत्परता दाखवत लांडर, बोरघर, तळाघर विभागात पंचनाम्यासाठी अधिकारी पाठविल्याचे समोर आले. आता बळीराजा फाउंडेशनच्या आक्रमक निवेदनाची संबंधित प्रशासन कितपत दखल घेतो, यावर बळीराजा फाउंडेशनची ठाम भूमिका काय असेल ? हे अधोरेखित होणार आहे.
रोहा तालुक्यातील शेकडो हेक्टर भातशेतीचे परतीच्या धुवांधार पावसाने नासधूस केली. उभ्या पिकांनी माना टाकल्या, शनिवार रविवार रात्रभर झालेल्या पावसाने पुन्हा शेतात पाणी तुंबले. त्यामुळे भाताचे अर्धाहून अधिक कणस मातीला मिळाले. सोन्यासारखा आलेला पीक पावसाने उद्धवस्त केला. याच पावसाची धास्ती घेत अनेक शेतकऱ्यांनी भाताची यंत्राद्वारे भात कापणी केली. त्यातून भाताची थोडी बहुत नासाडे थांबवता आली. अजूनही शेकडो एकर भातशेती उभीच आहे. त्या सर्व भातशेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी अन्यथा आंदोलन उभे करू असा इशारा बळिराजा फाउंडेशनने निवेदनातून दिले. भात शेतीचे सरसकट पंचनामे करावे, नुकसान भरपाई जाहीर करून दिली जावी, पंचनामे वेळेवर करण्यात हायगय केल्यास ते सहन करणार नाही असा इशारा बळिराजा फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी दिला. त्याची तातडीने दखल घेत सोमवारी लगेच कृषी अधिकारी कामाला लागले. तळाघर, लांढर विभागात शेती नुकसानीची माहिती घेत पंचनामासाठी अधिकारी पोहोचले. दुसरीकडे भात शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे असे निवेदन तहसीलदार किशोर देशमुख कृषी अधिकारी महादेव करे यांना देण्यात आले. यावेळी बळीराजा फाउंडेशनच्या अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भगत, सचिव ऍड दीपक भगत व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान बळीराजाच्या भयान संकटाचे महसूल संबंधित प्रशासनाला फारसे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. तहसील प्रशासनात गांभीर्य नाही हे सुद्धा स्पष्ट झाले. तलाठी गावोगावी अद्याप पोहोचलेच नाहीत मग पंचनामे कसले केले ? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे तर आता बळीराजा फाऊंडेशनने आक्रमक पवित्र घेतल्याने प्रशासन अंशतः नरमले हे समोर आले आहे.