रोहा (प्रतिनिधी) उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्याकांडाने संबंध राज्य चांगले हादरले. शिंदे हिची अत्यंत क्रूर हत्या करण्यात आली. घटनेची निंदा करावी तेवढे कमीच आहे. क्रूरकर्मा आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली. संबंधीत आरोपीला भर चौकात फाशी द्या असा आक्रोश चोहोबाजूने होत आहे. याच घटनेआधी ठाणेतील अक्षता म्हात्रे हिच्यावर चक्क मंदिरातील पुजाऱ्यांनी अतिप्रसंग करून हत्या केली. ह्याही घटनेचा सर्वत्र निषेध होत असतानाच मंगळवारी रोहा शहरात निघालेल्या यशश्री शिंदे हिच्या हत्याच्या निषेधार्थ मूक मोर्च्यात मोठ्या संख्येने रोहेकर एकटवले. मोर्च्यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नराधमांना फाशी द्या असा संताप मोर्चेकरांनी व्यक्त केला. राम मारुती चौकातून निघालेल्या मूक मोर्च्याची सांगता तीन बत्ती नाका पोलीस चौकात झाली. यावेळी तहसीलदार किशोर देशमुख यांना मोर्चेकरांनी निवेदन देऊन सरकाराकडे फाशीच्या शिक्षेची मागणी केली. दरम्यान, नागोठणे, कोलाड यांसह सर्वत्र निघालेल्या मोर्च्यात भगिनी अक्षता म्हात्रे, यशश्री शिंदे यांच्या हत्येचा एकत्रित निषेध केला. जात धर्म न पाहता नराधमांना फाशी द्या अशी मागणी झाल्याचे समोर आले, मात्र रोह्यातील मोर्च्यात अक्षता म्हात्रे हिच्या हत्येच्या निषेधाचा विसर पडला. पत्रकारांनी जाणीव करून देताच सर्वच नराधम सारखेच म्हणत अंशत: उल्लेख झाल्याचे अधोरेखीत झाले तर निषेध मोर्च्याला सबंध रोहेकरांनी मोठी गर्दी केल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यशश्री शिंदे हिच्या नराधम मारेकराला फाशी द्यावी. घटनेचा निषेधार्थ समस्त रोहेकर आयोजित मूक मोर्च्यांत राजकीय, सामाजिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला, नागरिकांनी मोठा सहभाग घेतला. काळ्या फिती लावून घटनेचा निषेध करण्यात आला. मारुती चौकात जैन साध्वी अर्हमव्रत्ताश्री यांनी तरुण मुली, महिलांनी कसे संस्कार अवलंबले पाहिजेत, कुटुंबाने मुलांकडे कसे लक्ष द्यावे यावर मार्मिक मार्गदर्शन केले. त्यानंतर मोर्च्याला प्रारंभ झाला. तीन बत्ती नाका पोलीस चौकातील मोर्चा सांगता कार्यक्रमात हभप मारुती कोल्हटकर महाराज यांनी हिंदू धर्म आणि संस्कार यावर अभ्यासू भाष्य केले. भगिनींवर असे अत्याचार होऊच नये, त्यावर प्रबोधन करत एकवटण्याची गरज कोल्हटकर यांनी व्यक्त केली. अरुंधती पेंडसे यांनी हिंदू समाजाने यापुढे काय करायला हवेत, मुलींना कसे जपावेत याचे मार्गदर्शन करत नराधमांनी धाडस करूच नये अशी एकी दाखवून दिली पाहिजे असे पेंडसे म्हणाल्या, यशश्री शिंदे हिच्या हत्येचा निषेध करावा तेवढे कमी आहे. नराधमांना सोडता कामा नयेत, भर चौकात फाशी द्या अशी आक्रमकता स्वरांजली शिर्के यांनी मनोगतातून व्यक्त केली. त्याचवेळी भगिनी अक्षता म्हात्रे हिच्यावरील अतिप्रसंग, हत्येच्या निषेधाचा उल्लेख न झाल्याची जाणीव पत्रकारांनी करुन दिली. त्यावर हा मोर्चा रायगडातील घटनेसंबंधीत आहे असे एकाने सांगताच अक्षता म्हात्रे आपली भगिनी नाही का ? त्यावरून नराधम ते नराधमच, कुठलीच घटना समर्थनीय नाही असे सांगत अंशत: खुलासा करण्यात आला. नराधमांना फाशी दिलीच पाहिजे असा संताप उपस्थितांतून व्यक्त झाला. यशश्री शिंदेच्या मारेकरी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार किशोर देशमुख यांना देण्यात आले. दरम्यान, अक्षता म्हात्रे पाठोपात यशश्री शिंदे यांच्या मारेकरी क्रूरकर्मांना काय शिक्षा होते ? हे समोर येणार आहे.