रविवारी रोहा येथे वृक्षारोपण महापर्व २०२४चा होणार प्रारंभ, सिटी ऑफ फ्लाॅवर्सचे मिशन, आरआयएच्या बैठकीत निसर्ग फुलविण्याचा निर्धार..!

Share Now

186 Views

रोहा (प्रतिनिधी) रोहा शहर, तालुका ग्रामीणाला रंगीत झाडे, फुलांनी बहरविण्याचा निर्धार सिटी ऑफ फ्लाॅवर्सने केला आहे. वर्षभरात कळसगिरीत विविध फुलांची झाडे लागवड, प्राचीन स्थापत्येचा तलाव मोकळा करण्याचा अभिनव काम करण्यात आले. या मोहिमेत विविध क्षेत्रातील मान्यवर, संस्था, तरुणांनी विशेष सहभाग घेतला. त्यातून कित्येकांना निसर्गाची गोडी लागली. प्रत्येक रविवारी कळसगिरीच्या डोंगरात श्रमदान, निसर्गाची अनुभूती घेण्याकडे अनेकांचा कल वाढला. आता याच आवडीतून निसर्ग फुलविणे, जपण्याचा वसा घेत वृक्षरोपण महापर्व २०२४ मिशन साकार करण्याचा निर्धार करण्यात आला. मंगळवारी आरआयए सभागृहातील महत्त्वाच्या बैठकीत २१ जुलै २०२४ रोजी रोहा शहर बायपास रस्ता दुतर्फा फुलांची झाडे लावून वृक्षारोपण महापर्व २०२४ च्या सप्ताहाला प्रारंभ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे तशी माहिती सिटी ऑफ फ्लॉवर्सचे प्रकल्प प्रमुख सुरेंद्र निंबाळकर, आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर यांनी दिली. दरम्यान, यावेळी रोहा शहर, तालुका रंगीत फुलझाडे, देशी झाडे, शेतीत विविध पिके घेत निसर्ग फुलविण्याची प्रतिज्ञा पर्यावरण प्रेमिकांनी केली आहे तर सिटी ऑफ फ्लाॅवर्सच्या पर्यावरण संरक्षण चळवळीला अनेक संस्था, व्यक्तींनी पाठबळ देण्याची संमतीही दर्शवली आहे.

सिटी ऑफ फ्लाॅवर्सची रंगीत फुलांचा शहर, तालुका संकल्पना अधिक प्रगल्भ होत आहे. रोहा शहराला फुलांचे शहर, मुख्य रस्ते, उपरस्ते गर्द झाडांनी फुलविण्यात येण्याच्या निर्णयातून मंगळवारी धाटाव येथील आरआयएच्या सभागृहात निसर्गप्रेमी, कंपन्यांचे अधिकारी, पत्रकार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर, प्रकल्प प्रमुख सुरेंद्र निंबाळकर, सिटीझन फोरमचे आप्पा देशमुख, समन्वयक राजेंद्र जाधव, नितीन जोशी, लक्ष्मण शिटयाळकर, उदय ओक, भाऊसाहेब माने, सुखद राणे, प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, विज्ञान खवरे, दळवी बंधू, प्रथमेश शिर्के, हेमंत मोहिते, समिधा अष्टीवकर यांसह सिटी ऑफ फ्लाॅवर्सचे पदाधिकारी, कंपन्यांचे अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत मुख्य रस्ते, उपरस्ता दुतर्फांना झाडे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. झाडे लावण्याचा सप्ताह पाळण्याचे ठरवण्यात आले. यावेळी प्रकल्प प्रमुख सुरेंद्र निंबाळकर यांनी सिटी ऑफ फ्लाॅवर्सच्या माध्यमातून कळसगिरी जंगलातील उपक्रमांची माहिती दिली. निर्जन झालेल्या तलावाने मोकळा श्वास घेतला. रंगीत फुलांची झाडे लावण्यात आली. आता ही मोहीम अधिक व्यापक करून पूर्ण शहर, तालुका झाडांनी फुलविण्याचा आमचा निर्धार आहे. त्या संकल्पनेला आपणा सर्वांचे सहकार्य गरजेचे आहे असे सांगत निंबाळकर यांनी झाडे लावण्याचा शुभारंभ २१ जुलै २०२४ रोजीच्या कार्यक्रमाची रूपरेषा विस्तृत केली. आरआयएचे अध्यक्ष पी पी बारदेशकर यांनी रस्ते, जंगल झाडांनी अधिक फुलविणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आपण सगळेजण एकत्र येऊन हे कार्य मिशन म्हणून साध्य करू या, सहकार्याचा हात कायम पुढे असेल असे ठोस आश्वासन बारदेशकर यांनी दिले. यावेळी राजेंद्र जाधव, बापू जोशी, सुखद राणे, उदय ओक, विज्ञान खवरे, नरेश बिरगावले व इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीला विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन दयानंद नांदगावकर यांनी केले. दरम्यान , रविवारी आयोजित वृक्षरोपण महापर्व २०२४च्या मिशन कार्यक्रमाला निसर्गप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिटी ऑफ फ्लाॅवर्सने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *