रोहा (प्रतिनिधी) सर्वांनाच हवेसे वाटणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व, सामाजिक मुख्यतः राजकारणात सामाजिक भान असलेले अजित पवार गट रोहा तालुका राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष विनोद पाशिलकर यांची नुकतीच मा. राज्यपाल यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागली आहे. खा सुनिल तटकरे यांच्या शिफारशीनुसार पाशिलकर यांची महत्वाच्या पदावर निवड झाली. एमआयडीसीतील धाटाव मुक्कामी असलेले विनोद पाशिलकर यांच्या योग्य निवडीचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले. पाशिलकर यांच्या निवडीनंतर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खा सुनिल तटकरे, माजी आ अनिकेत तटकरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस विजय मोरे, सकल मराठा समाज अध्यक्ष आप्पा देशमुख पदाधिकारी यांसह अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर अभिनंदनचा वर्षाव झाला आहे. दरम्यान, धाटाव एमआयडीसीतील एक्सेल, डीएमसी, सॉल्वे, युनिकेम व अन्य कंपन्या वायू, जल प्रदूषण करीतच आहेत, मागील आठवड्यात तळाघर, वरसे, रोठ विभागात विषारी वायू प्रदूषण घटना घडली होती. गंभीर प्रदूषण घटनांच्या पार्श्वभूमीवर विनोद पाशिलकर यांची स्थानिक म्हणून निवड झाल्याने निवडीला कमालीचे महत्त्व प्राप्त झाले तर सततचे वाढते विषारी वायू, जल प्रदूषण यांसह कंपन्यांची निकामी यंत्रणावर नियंत्रण येऊन मुख्यतः विषारी प्रदूषण नियंत्रणात आणण्याची अपेक्षा नवनिर्वाचित सदस्य विनोद पाशिलकर यांच्याकडून व्यक्त झाली आहे.
राजकारण विशेषत: समाज कार्यात लौकिक असलेल्या विनोद पाशिलकर यांच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य निवडीने सबंध रोहेकरांच्या अपेक्षा वाढल्या. पाशिलकर हे अनेक वर्ष राजकारणात आहेत. अनेक चढउतार पाहिले. यशवंत ग्रामपंचायत धाटाव सरपंच पद भूषविले आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लोकनेते भाईसाहेब पाशिलकर यांचा लोकहिताचा वारसा पुत्र विनोद पाशिलकर पुढे नेत आहेत. उधार पाधार विनोद पाशिलकर यांचा आधार असाच सामान्यांना कायम दिलासा आहे. खा सुनिल तटकरे यांचे खास विश्वासू असलेले विनोद पाशिलकर यांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी वर्णी लागल्याने जोखीम तितक्याच महत्त्वाच्या विभागाचे अनुभव प्रचितीला येणार आहे. अजित पवार गट राष्ट्रवादी रोहा तालुका अध्यक्षपदाची धुरा विनोद पाशिलकर सांभाळत आहेत. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य पदाची जबाबदारी विनोद पाशिलकर यांच्या खांद्यावर आल्याने एमआयडीसी व अन्य परिसरातील विषारी वायू व नदीत जाणारे जल प्रदूषणावर नियंत्रण मिळेल अशी अपेक्षा विभागातील नागरिकांनी केली आहे. वायू, जल प्रदूषण करणाऱ्या कंपन्या, त्यांना पाठीशी घालणारे प्रदूषण नियंत्रक मंडळाचे अधिकारी यांच्या खाते धोरणाला आळा बसेल, जल वायू प्रदूषण रोखण्यात अशंत: यश येईल अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त झाली तर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्यपदी विभागातून पहिल्यांदाच विनोद पाशिलकर यांच्या निवडीचे समाधान व्यक्त झाले आहे. आता विनोद पाशिलकर पदभारात कितपत प्रभाव टाकतात, सर्वकश प्रदूषणाला कितपत आळा बसतो ? हे पहावे लागणार आहे.