रोहा (प्रतिनिधी) सरकारी नोकरी लावतो, माझी वरपर्यंत पोच आहे, नोकरीचं काम पक्क होणार, अशी बतावणी करत एका शाळेच्या पारंगत शिपायाने रोह्यातीलच एकाला चक्क ५ लाखाला गंडा घातल्याची गंभीर घटना घडली. अबब म्हणावा अशाच ह्या धक्कादायक प्रकाराने सबंध जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सामान्य कुटुंबातील संबधित तरुणाला सरकारी नोकरीचे स्वप्न अक्षरशः महागात पडले. तब्बल ५ लाखाला चुना लागल्याचे उघड झाल्याने तरुणांनो सावधान, उघडा डोळे असेच म्हणण्याचा बाका प्रसंग आला आहे. दरम्यान, प्रसिद्ध भामटा आरोपी शिपाई शहरातील एका नामांकीत शाळेत शिपाई पदावर काम करत आहे, त्याचे कारनामे अंशतः माहिती असूनही आतापर्यंत शाळेने काहीच कारवाई न केल्याने यामागे गौडबंगाल काय ? अशी चर्चा आता सुरू झाली आहे, तर नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार भांबावलेल्या तरुणांना लुटणारी टोळी जिल्ह्यात पुन्हा कार्यरत असल्याचे बोलले जात आहे, त्यांना पायबंद घालण्यात जिल्हा पोलीस यशस्वी ठरतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रोहा शहरातील एका खाजगी नामांकीत शाळेत शिपाई असलेल्या आरोपी नदीम इब्राहिम खेडेकर (रा. खालचा मोहल्ला रोहा) याने अत्यंत सफाईने नोकरी देण्याचे आमिष दाखवून कपडा व्यावसायिक सचिन राजबहादूर खरवार (रा. अष्टमी रोहा) याला जाळ्यात ओढले. मोबाईलवर संपर्क करून कोकण भवन कार्यालयात उच्च पदावर काम करणाऱ्या मॅडम माझ्या ओळखीच्या आहेत, नोकरीसाठी रक्कम मोजावी लागेल. त्यानुसार सचिन खरवार याने ११ मे २०२३ रोजी ११ हजार गुगल पे केले, दस्तऐवज तपासणी कामासाठी ३ हजार दिले, ३ मे २०२३ ते जुलै २०२३ या दरम्यान नोकरीचे फिक्स करतो अशी बतावणी करत आरोपीने सचिन खरवार याच्याकडून पुन्हा तब्बल ९ लाख ५० हजार लुटले, त्यानंतर मंत्रालयातून कोरी सेवा पुस्तिका, आयकार्ड आणून कोकण भवन येथे जल व आरोग्य विभागात नोकरी देण्याची अखेर फसगत केली, तरुणाला विश्वासघात झाल्याचे जाणवले. नंतर आरोपीकडे पैसे देण्याचा तगादा लावला असता ४ लाख ५० हजार रुपये मिळाले, उर्वरित ५ लाख परत दिलेच नाहीत, शेवटी फिर्यादीने पोलीस अधिक्षक यांच्या कार्यालयात धाव घेतली आणि बिंग फुटले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये आरोपी शिपाई नदीम खेडेकर याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ए जी पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, मुरलेला आरोपी फरार असल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली, तर आरोपीने याआधी स्कॉलरशिप, विविध योजना, नोकरी लावण्याच्या बतवणीत अनेकांना लुटल्याचे बोलले जात असल्याने खोलात तपास करावा, यामागे नेमका म्होरक्या कोण ? हे समोर आणावे अशी मागणी झाली आहे.