रोहा (प्रतिनिधी ) जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज शेती व्यवसायापासून दूर जातोय हे वातस्व असतानाच रायगड प्रेस क्लब, रोहा प्रेस क्लबने अभिनव उपक्रम सुरू केला. बळीराजाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष स्व. संतोष पवार यांची संकल्पना, प्रेस क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील कृतिशील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो. या अनुषंगाने रोहा प्रेस क्लबच्या वतीने नुकतेच आदर्श शेतकरी सन्मानाने प्रयोगशील युवा शेतकरी रतीश मगर (रा. घोसाळे) आणि केशव खरिवले (रा. सांगडे) यांना त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन गौरविण्यात आले. दरम्यान, कृतिशील शेतकऱ्यांचा सन्मान रोहा प्रेस क्लब पत्रकारांनी केल्याने शेतकरी संघटना, कृषी विभाग व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कृतज्ञता व्यक्त केली तर हा पुरस्कार शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, संधी यांना अधिक प्रोत्साहन देणारे आहे अशी भावना आदर्श शेतकरी सन्मान प्राप्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेली सोळा वर्ष अविरतपणे रायगड जिल्ह्यात रायगड प्रेस क्लबच्या वतीने तसेच रोहा प्रेस क्लबच्या माध्यमातून येथील कृतिशील आणि प्रयोशिल प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आदर्श शेतकरी रतीश मगर, केशव खरीवले यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान सोहळ्याला रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, मराठी पत्रकार परिषदेचे कोषाध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, अधिकारी कांबळे आण्णा, प्रिया कांबळे, रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले, कृषी अधिकारी प्रकाश राक्षीकर, राजेंद्र जाधव, ज्येष्ठ ग्रामस्थ खेळू ढमाळ, सरपंच मारुती तुपकर, सदस्या सौ शेळके, पोलीस अधिकारी सुनील शिरसाट, शरद कोटकर, गणेश ढेरे, युवा कार्यकर्ते महेश तुपकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मिलिंद अष्टीवकर, कृषी अधिकारी महादेव करे, राजेंद्र जाधव यांनी उत्तम मार्गदर्शक केले. शेतकरी रतीश मगर, केशव खरीवले यांनी शेतीबाबत तसेच विविध पिके, शेती पूरक व्यवसाय मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती देत आधुनिक तंत्रज्ञानाचा, शेती प्रयोगाचे फायदे बदलत्या काळात युवा पिढीला प्रेरणादायी ठरेल असे एक आदर्शवत शेती बाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरीवले यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक नरेश कुशवाह, श्याम लोखंडे, नंदकुमार मरवडे, शरद जाधव, जितेंद्र जाधव, संदीप सरफळे, महेश बामुगडे, अंजुम शेटे, समिधा अष्टीवकर, नंदकुमार बामुगडे, संतोष सातपुते व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.