उरण मध्ये एनएमएमटी सेवा सुरु करण्याची मंगेश तांडेल यांची मागणी, रेल्वेसेवेच्या अपुऱ्या फेऱ्यामुळे विद्यार्थ्यांना फटका

Share Now

126 Views

उरण ( विठ्ठल ममताबादे )अनेक वर्षांपासून उरण तालुक्यात सुरु असलेली एनएमएमटी बससेवा दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानक बंद करण्यात आली आहे. सदरची बससेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी उरण तालुक्यातील सोनारी गावचे सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी प्रशासनाकडे केली आहे. नवीमुंबई महानगर पालिकेच्या परिवहन विभागाच्या वतीने उरण ते नवी मुंबई मार्गावर बस सेवा सुरु होती. जुईनगर ते उरण शहरासह तालुक्यातील कोप्रोली, वशेणी व पिरकोन या मार्गांवर चालणाऱ्या ३०, ३१ व ३४ क्रमांक असलेल्या एनएमएमटी बस दिनांक २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानकपणे बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यवसाय, नोकरी, धंदा, कार्यालयीन व दैनंदिन कामासाठी मुंबई, ठाणे, नवीमुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. त्याच प्रमाणे आर्थिक नुकसान देखील होत आहे. याशिवाय दहावी, बारावी तसेच विविध कोर्स तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी उरण तालुक्यातील विद्यार्थी मुंबई, नवी मुंबई मध्ये शिकण्यासाठी मोठया प्रमाणात जात असतात. या सर्वांसाठी एनएनएमटी बसने प्रवास करणे सुरक्षित एकमेव व उत्तम पर्याय होते. मात्र एनएमएमटी बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे मोठया प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. उरण मध्ये रेल्वे सेवा सुरु झाली आहे मात्र रेल्वेच्या फेऱ्या नवी मुंबई साठी एक – एक तासाने आहेत. रेल्वे सेवेच्या नवी मुंबईत जाण्यासाठी व नवी मुंबई मधून परत उरण मध्ये येण्यासाठी फेऱ्या कमी असल्यामुळे व वेळेत रेल्वे सेवा नसल्याने रेल्वे सेवेचा प्रवाशांना योग्य तो फायदा होत नाही.रात्री १० नंतर रेल्वे सेवा बंद असल्यामुळे विद्यार्थी सुरक्षित प्रवास करू शकत नाही. आणि रेल्वे रात्री मिळाली नाही तर विद्यार्थी व प्रवाशांना नवी मुंबई मध्ये रात्री अडकून राहावे लागते. रेल्वे सेवेचा विद्यार्थ्यांना कोणताच फायदा नाही. त्यामुळे उरण तालुक्यात एनएमएमटी तात्काळ सुरु करण्याची मागणी सोनारी येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश तांडेल यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *