रोहा (प्रतिनिधी) धाटाव एमआयडीसीतील साधना कंपनी स्फोट दुर्घटनेतील मृत्यूची मालिका सुरूच आहे. थरकाप उडवून दिलेल्या घटनेत चौथा जखमी कामगार अनिल मिश्रा वय ४४ याचाही उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने साधना कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात सर्वत्र संताप व्यक्त झाला आहे. आता मृत्यूची संख्या ४ वर गेली आहे. सर्वच जखमी मृत्यू कामगार परप्रांतीय बिहार, उत्तर प्रदेशातील आहेत. त्यातील दोघेजण अविवाहित तरुण आहेत. त्यामुळे चोहोबाजूने हळहळ व्यक्त झाली आहे. दोन कामगारांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, भयानक स्फोट दुर्घटना घडूनही कंपनी व्यवस्थापन अजून भानावर आलेले दिसत नाही. मालाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दुर्घटना प्लान्ट व्यवस्थापनाने लगेचच गुपचूप सुरू केल्याचे समोर आल्याने शिवसेना ठाकरे गट शनिवारी प्रचंड आक्रमक झाला. संबधीत व्यवस्थापन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, लगेचच प्लान्ट सुरू केले जाते, हे भयानक आहे. याविरोधात प्रसंगी आम्ही आंदोलन उभे करू असा ईशारा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी दिला तर स्फोट दुर्घटनेतील
जखमी अनिल मिश्रा हा कामगारही मृत्यमुखी पडल्याने कंपनी व्यवस्थापनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आला. यावर कारखाना निरीक्षक प्रशासन चिडीचुप का? अशीही चर्चा सुरू झाली आहे.
साधना नायट्रोकेम कंपनीत गुरुवारी मेथानॉल टाकीचा प्रचंड स्फोट झाला. त्या स्फोटात आधी दिनेश कुमार, संजीव यादव यांचा जागीच मृत्यू झाला. पाठोपाठ बसकी यादव याचाही मृत्यू होऊन संख्या ३ वर गेली होती. स्थिती सावरते तोच ऐरोली रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनिल मिश्रा वय याचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. स्फोटात ४ जणांना जीव गमवावा लागला. तब्बल तीन दिवस मृत्यूची मालिका सुरू राहिल्याने साधना कंपनी व्यवस्थापनाचे सर्वच दावे फोल ठरले. दुसरीकडे मृत्यू कामगारांच्या कुटुंबांचीही अवहेलना झाली. योग्य उपाययोजना केल्या नाही. कुटुंबाला योग्य न्याय्य दिला नाही असा प्रचंड राग कुटुंब व समाजात आहे. मृत्यूची मालिका सुरू असतानाच व्यवस्थापनाने माणुसकीच्या संवेदना मारत अत्यंत घाईत तोच दुर्घटना प्लांन्ट लगेचच गुपचूप सुरू केला, हे धक्कादायक तेवढेच संतापजनक आहे असा आरोप ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केला. अपूरी सुरक्षा व्यवस्था अपघाताला कारणीभूत ठरली. असंवेदनशील मॅनेजर जे टी कुट्टी व संबंधीतांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अन्यथा ठाकरे शिवसेना आंदोलन उभे करेल असा सज्जड ईशारा शेडगे यांनी दिल्याने काय होते ? हे पहावे लागणार आहे. दरम्यान,चौथ्या कामगाराची मृत्यूची झुंझही अपयशी ठरली, अनिल मिश्रा याचाही तडफडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मुख्यत: कंत्राटी कामगार तेही परप्रांतीय कामगारांच्या जीवाला मोल दिले जात नाही, हेच धक्कादायक वास्तव यातून स्पष्ट झाले तर साधना दुर्घटनेतून एमआयडीसीतील कंपन्या आतातरी काय बोध घेतात ? हे पुढे समोर येणार आहे.