आठवड्यातील दोन घटनांनी रोहा हादरला, दुसऱ्या घटनेतील तरुणाचा मृतदेह सापडला, सर्वच वेदनादायी

Share Now

855 Views

रोहा (प्रतिनिधी) कुंडलिकेच्या पुराच्या पाण्यात बुधवारी भुवनेश्वर येथील व्यक्तीने उडी मारली. त्याचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला. संबंधीत व्यक्तीने असे सहज जीवन का संपवले, ही वेदनादायी घटना असतानाच शुक्रवारी सायंकाळी चणेरा विभागातील लक्ष्मीखार येथील हिमेश ठाकूर वय १७ वर्ष हा शालेय विद्यार्थी बंधाऱ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. लागोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांनी रोहा तालुका अक्षरशः हदरला. दरम्यान, रोहा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अपघाती घटनांनी अनेक प्रश्न उपस्थित झाले. रोजगार नाही, कर्जबाजारी, आजारपण त्यातून मानसिक ताणतणाव अनेक व्यापाने तरुण गांगरून गेलेत. मग टोकाचा पाऊल उचलतात तर शालेय मुलांना पालकांनी सांभाळावे, त्यांच्यावर लक्ष ठेवावे, नको त्या अघटीत घटना घडतात हा संदेश अपघाती घटनांतून पुन्हा मिळाला आहे.

बुधवारी भुवनेश्वर येथील व्यक्तीने अत्यंत शांतपणे कुंडलिकेच्या पात्रात स्वतःला झोकून दिले. त्याचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला, ही घटना ताजी असतानाच खांबेरे हद्दीतील बोबडघर नजीकच्या बंधार्‍यात पाण्याचा अंदाज आला नाही. मित्रांसोबत पोहायला गेलेल्या हिमेश ठाकूर ह्या शालेय विद्यार्थ्यांचा पाय घसरून वाहून गेल्याची खळबळजनक घटना घडली. शनिवारी दुसऱ्या दिवशी संबंधीत तरुणाचा मृतदेह सापडल्याचे प्रशासनाने सांगितले. लहानग्या मुलाच्या मृत्यूने कुटुंबाने हंबरडा फोडला. लहानग्याच्या अपघाती मृत्यूने सबंध चणेरा विभाग चांगलाच हबकून गेला. २४ तासाहून अधिक काळ तरुणाचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. तहसीलदार किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, सह्याद्री वन जीवन रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांनी शोध कार्य सुरू होते अशी माहिती नायब तहसीलदार राजेश थोरे यांनी दिली. दरम्यान, महिनाभर धुवाधार पावसाने नदीनाले, ओहळ तुडुंब वाहत आहेत. त्यात पाण्याचा अंदाज येत नसल्याने अपघाती घटना घडतात. धबधबे, धरण, बंधारेत अनेकजण वाहून गेल्याच्या घटना समोर आल्याने अधिक सावधान राहणे, पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे तर पाठोपाठ घडलेल्या दोन्ही घटनांनी रोहा तालुका हादरून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *