रोहा (प्रतिनिधी) विभागीय कालव्याच्या पाण्यासाठी चळवळ उभी करत अखंड शेतकरी, निसर्गाच्या हितासाठी झटणाऱ्या बळीराजा फाऊंडेशनच्या बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्यांना जय गणेश मित्र मंडळ भुवनेश्वर (रोहा) सार्वजनिक श्री गणरायाची आरती करण्याचा रविवारी बहुमान मिळाला. ग्रामीणातील शेतकऱ्यांना श्री गणेशाच्या आरतीचा मान देत पुढाकार घेण्याच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल जय गणेश मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रोहा तालुक्यातील प्रख्यात भुवनेश्वर (वरसे) येथील जय गणेश मित्र मंडळाचा सार्वजनिक गणेशोत्सव विविध उपक्रमाने परिचीत आहे. सामाजिक कार्याला नेहमीच प्राधान्य दिले जाते. जय गणेश मित्र मंडळाचा पुढील वर्षी रौप्य महोत्सवी आहे. तब्बल २४ वर्ष सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. रक्तदान शिबीर, शैक्षणिक कार्यक्रम, सामाजिक सेवाभावचा वसा कायम ठेवला. सर्वच क्षेत्रातील मान्यवर, संस्थांना आरतीचा मान दिला जातो. रविवारी शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या, कृषी योजनांसाठी पाठपुरावा करणाऱ्या बळीराजा फाऊंडेशनच्या शेतकऱ्यांना आरतीचा मान दिला. अध्यक्ष विठ्ठल मोरे, संस्थापक राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष तुकाराम भगत, सचिव ॲड दीपक भगत, खजिनदार रुपेश साळवी व पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते. अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी व मान्यवरांनी श्री गणेशाची आरती केली. यावेळी राजेंद्र जाधव यांनी जय गणेश मित्र मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सव परंपरेचा कौतूक केला. विविध उपक्रमांनी मंडळाचे सर्वदूर कौतूक होत आहे, आम्हा बळीराजा फाऊंडेशनच्या शेतकऱ्यांना आरतीचा मान दिला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो अशी भावना जाधव यांनी व्यक्त केली. जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष नितीन माने व पदाधिकारी यांनी सर्वांचे स्वागत केले.