रोहा (प्रतिनिधी) सध्यास्थितीत निसर्गाचा प्रचंड लहरीपणा आहे. विजेची कमतरता, सिंचनाचा अभाव यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. अशात सूर्यप्रकाश, जमीन, पाणी, हवा जास्तीत जास्त नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करणे क्रमप्राप्त आहे. योग्य पद्धतीने नैसर्गिक साधने वापरून पर्यावरणपूरक शेती करावी. त्यात नैसर्गिक ऊर्जेच्या वापरातून उत्पादन खर्चात बचत शक्य आहे. यासाठीच प्रधानमंत्री कुसुम योजना कार्यान्वित झाली आहे. सदर योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी केले. दरम्यान, आयोजित प्रधानमंत्री कुसुम योजना कार्यशाळेत जिल्ह्यातील रोहा, माणगांव, महाड, मुरुड, पाली, पोलादपूर, अलिबाग सर्वच तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला तर शेतकरी आता आधुनिक पद्धतीने नैसर्गिक ऊर्जेच्या वापराला प्रारंभ करतील अशी अपेक्षा कार्यशाळेतून व्यक्त झाली आहे.
रोहा येथे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली सलग्न किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रात नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय दिल्ली, भारतीय कृषी अनुसंघान परिषद नवी दिल्ली, आयएए जर्मन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अस्की यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा महाअभियान एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ मनोज तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यशाळेत गीझ इंडियाचे प्रतिनिधी रणजीत जाधव, अस्कीचे प्रतिनिधी आशुतोष पाटील, लीड बँकेचे मॅनेजर प्रणव कामत, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रीय सल्लागार रूपाली देवकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी रणजीत जाधव यांनी प्रधानमंत्री कुसुम योजनेविषयी थोडक्यात माहिती देऊन अवलंबनात असणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी कार्यशाळेचे महत्व विशद केले. नैसर्गिक ऊर्जेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जाधव यांनी केले. आशुतोष पाटील यांनी सादरीकरणाद्वारे प्रधानमंत्री कुसुम योजनेची वैशिष्ट्ये, निकष, लाभार्थी पात्रता, आवश्यक कागदोपत्रे व शेतकऱ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ याविषयी प्रगतीच्या यशोगाथाची माहिती पाटील यांनी दिली.
अध्यक्षिक भाषणात डॉ. मनोज तलाठी यांनी निसर्गाचा लहरीपणा, विजेची कमतरता, सिंचनाच्या अभावावर नैसर्गिक ऊर्जेचा वापर किती गरजेचा आहे हे समजावून सांगितले. पर्यावरणपूरक शेती, नैसर्गिक ऊर्जेच्या वापरातून उत्पादन खर्चात बदल शक्य आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांचे सूचनेनुसार विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञान विषयीचे विविध ॲप शेतकऱ्यांनी मोबाईलवर डाऊनलोड करून हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त वापरावे असे आवाहन डॉ. तलाठी यांनी यावेळी केले. दुपारच्या सत्रात योजना राबविण्याबाबत असणाऱ्या अडचणी व त्यासंबंधी असणारे निकष याविषयी शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले. नवीन तंत्रज्ञान कार्यशाळेत चर्चा करण्याची संधी दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. डॉ. प्रमोद मांडवकर यांनी सूत्रसंचालन, श्री आरेकर यांनी आभार प्रदर्शन केले. किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या सोलर पॅनलला शेतकऱ्यांनी भेट देऊन कार्यशाळेची सांगता झाली.