रोहा (प्रतिनिधी) भाजी पिकातील पडवळ पिकाला आहारात महत्त्वाचे स्थान आहे. पडवळ पिकामध्ये औषधी गुणधर्म मोठ्या प्रमाणात आहे हे महत्त्व जाणून शेतकऱ्यांनी पडवळ पिकाची लागवड अधिक मोठ्या प्रमाणात करावी, त्याबाबत शास्त्रीय माहिती समजून घ्यावी यासाठी मंगळवारी रोहा येथे पडवळ उत्तम कृषी पद्धती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत राज्यातील पडवळ पिकासंबधी ही पहिलीच कार्यशाळा ठरली आहे. पहिल्या कार्यशाळेचा मान रोह्याला मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रशासन, संस्थेचे आभार व्यक्त केले आहे.
सहकार व पणन विभाग अंतर्गत आशिया विकास अर्थ सहाय्य महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्पांतर्गत सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग रायगड, कृषी विज्ञान केंद्र यांच्या माध्यमातून पडवळ उत्तम कृषी पद्धती कार्यशाळेचे जेष्ठ नागरिक सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ मनोज तलाठी, तालुका कृषी अधिकारी महादेव करे, सुशिल रेळेकर, हेमंत जगताप, तुषार जंगम, अनंत बंगाल, ज्ञानेश थोरात, आदी प्रकल्प संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. तालुक्यात पडवळ पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. घरोघरी पडवळची लागवड केली जाते. पडवळ भाजीत मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे पडवळ पीक अधिक घेतले जावे, याबाबत शास्त्रीय माहिती समजून घ्यावी यासाठी ही कार्यशाळा महत्त्वाची ठरत आहे असे डॉ मनोज तलाठी यांनी सांगितले. हेमंत जगताप यांनी मॅग्नेट प्रकल्पाने महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाला रोहा येथे पडवळ पीक कार्यशाळा घेण्याची संधी दिली याबाबत आभार व्यक्त केले तर रायगड जिल्ह्यात भाजी पाल्याचे क्षेत्र मोठे आहे. त्याच त्यात पडवळ हे प्रमुख पीक आहे. आता शास्त्रीय पद्धतीने लागवड करून अधिक उत्पादन मिळविता येईल, यासाठी कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची ठरली. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी महादेव करे यांनी केले.
आयोजित पडवळ उत्तम कृषी पद्धती कार्यशाळेत महिला शेतकऱ्यांनी मोठा सहभाग नोंदवला. कार्यशाळेत पडवळ पिकाची शास्त्रीय पद्धत याविषयी डॉ राजेश मांजरेकर, यांनी मार्गदर्शन केले. पडवळ पिकाचे कीड व रोग व्यवस्थापन यावर डॉ जीवन आरेकर, पडवळ पिकाचे काढणी पश्यात व्यवस्थापन व उपपदार्थ विषयी डॉ. राजेंद्र कदम, पडवळ पिकाचे मार्केटिंग व्यवस्थापन यावर रमेश चौगुले, महिलांसाठी लैंगिक व सामाजिक विषमता विषयी ज्ञानेश थोरात यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे आयोजन विनायक कोकरे, मिलिंद आकरे, डॉ अमोल यादव, मिलिंद जोशी, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्ह्यातील तब्बल १४२ प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला अशी माहिती कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिली.