रोहा ( सुहास खरीवले) ज्येष्ठ नागरिकांच्या प्रती आपुलकी जपत ज्येष्ठ नागरिक मंडळ रोहा यांच्या वतीने आयोजित केला जाणारा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन समारंभ रोह्यातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ज्येष्ठांच्या उत्साही उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रथेप्रमाणे, दिप प्रज्वलन गणेश पूजन व देवी सरस्वती पूजनाने झाला. यावेळी व्यासपीठावर प्रकाश विचारे, व्ही टी देशमुख, महंमद डबीर, डॉ वेदक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग सरफळे रावसाहेब यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश ज्येष्ठ नागरीकाना त्यांच्या वाढत्या वयोमानानुसार दैनंदीन जीवनात उद्भवणाऱ्या समस्यांना सामोरे जावून जीवन सुकर, सुरक्षित होईल व आरोग्यमान सुदृढ कसे राहील याविषयी प्रबोधन केले. वयोमानाचे दृष्टीने अतिवृद्ध स्थितीत जगत आहेत, त्याना पुढे जगण्याची उमेद व स्थैर्य कसे मिळविता येईल यासंबधी मार्गदर्शन केले. तसेच शासनाने मेळावे, परिषदा, शिबीरे भरवून वृद्धांचे जीवनास सुरक्षिता मिळेल अशा योजनांची माहीती देवून त्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. पाश्चात्य प्रगत देश आपल्या शासन व्यवस्थेत वृद्धांना स्वतंत्र स्थान देवून लांचे जीवन सुकर, सुरक्षित व समाधानी होण्याच्या दृष्टीने शासनाच्या यंत्रणा राबवून ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देत आहे. मात्र भारतात वृद्धांना अशा प्रकारचे संरक्षण मिळत नाही. सन १०९९ पासून केंद्र सरकार, राज्य सरकारने वृद्धांचे संरक्षणासाठी केवळ अखर्चिक, म्हणजे शासनाचे तिजोरीवर तोशीस पडणार नाही असे आजपर्यंत चार वेळा धोरण जाहीर केले. मात्र प्रत्यक्ष कृतीत काहीच न झाल्यामुळे भारतात वृद्धांची जीवन जगण्याची अवस्था दयनीय झाल्याचे दृश्य आहे.
वृद्धांनी जीवन जगण्यासाठी त्यांना आधार व पोषक होऊ शकेल अशा अर्थीक मदतीच्या योजना मंजूर व्हाव्या यासाठी ज्येष्ठ नागरीकांच्या अनेक संस्था द्वारे शासन दरबारी मागण्या मांडल्या गेल्या. गोवा सरकारचे धरतीवर आर्थिक दृष्ट्या कमकुवत ज्येष्ठ नागरिकांना दरमहा वैद्यकीय भत्ता अथवा चरितार्थ भत्ता मिळावा यासाठीही ज्येष्ठ नागरीक संस्थानी शासन दरबारी आग्रही भूमिका मांडली. परंतु त्यावर विचार केला जात नाही हे वास्तव आहे. ज्येष्ठ नागरीक मंडळ रोहाचा कार्यभार, व्यवस्थापन कामकाज यासाठी सरकारकडून कोणतेटे अर्थीक अनुदान मिळत नाही, त्यामुळे सभासद व काही सामाजीक दानशूर व्यक्तींकडून मिळणाऱ्या वर्गणी व देणगीच्या रकमेतूनच कामकाज सक्षमतेने व समर्थपणे चालविले जाते याचा सार्थ अभिमान मंडळास आहे.
रोहा या तालुक्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सभागृह बांधण्यासाठी खासदार सुनिलजी तटकरे साहेब यांचे योगदान लाभले त्यांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना धन्यवाद दिले. यावेळी ज्या ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे जीवनातील स्वीकारलेली कर्तव्य व जबाबदारी योग्य व यशस्वीरित्या पार पडून वयाची ८० वर्षे पूर्ण केली आहेत असे निहालचंद जैन, दत्तात्रेय धनावडे, कुंदनवन जैन, शरद गुडेकर, संगीता वेदपाठक, प्रमोदिनी देसाई यांसह १८ सभासदांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. मानवतेच्या दृष्टिकोनातून निस्वार्थीपणे सेवाभावी वृत्तीने समाजात काम करणारे रोहा सिटिझन फोरमचे नितीन परब, स्पंदन संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा अम्ब्रे, सर्प-पशू-पक्षी, वृद्ध सेवा संस्थेचे अध्यक्ष कुमार देशपांडे, ज्ञानगंगा बहुविकलांग संस्थेचे अध्यक्ष अशोक जोशी यांनाही शाल श्रीफळ व सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
प्रकाश विचारे, महंमद डबीर, डॉ वेदक, नितीन परब, स्नेहा अम्ब्रे, अशोक जोशी यांनी मनोगतं व्यक्त केली. सुत्रसंचलन सुरेश मोरे सरांनी तर आभार प्रदर्शन एस एन गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाश पाटील, सुधाकर वालेकर, महादेव भोईर, गावडे गुरुजी, अनंत पाटणकर, सुधाकर गडकरी, नारायण पाटील, शैलजा देसाई, संजिवनी कडवेकर, संध्या मळेकर यांनी मेहनत घेतली.