रोहा (प्रतिनिधी) तालुक्यातील तळाघर गावातील ग्रामस्थ, युवक मुख्यतः महिलांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा भन्नाट संदेश दिला आहे, तब्बल एक किलो मीटर अंतराच्या रस्ता दुतर्फा शेकडो झाडे लावून वृक्षारोपणाची अक्षरशः चळवळ उभी केल्याचे समोर आले. तळाघर ग्रामस्थ आयोजित रविवारी भव्यदिव्य वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. गावातील असंख्य ग्रामस्थ, महिला, तरुणांनी हातात झाडे, पावडे, टिकाव घेऊन वृक्षारोपणाला प्रारंभ केला. एकाच वेळी शेकडो झाडांची लागवड करण्यात आली. लावलेली झाडे संवर्धन करून मोठी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यासाठी घरातील प्रत्येकाने झाड दत्तक घेण्याचा संकल्प केल्याचे ग्रामस्थ रुपेश शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, तळाघर गावच वृक्षरोपणात सहभागी झाल्याने सबंध तालुक्याला आगळा वेगळा संदेश मिळाल्याचे अधोरेखीत झाले तर वृक्षारोपणात गावातील पुढाकार घेण्याचे तरुण नेतृत्वाने केलेले प्रयत्न चांगलेच यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.
तळाघर ग्रामस्थ आयोजित भव्य वृक्षारोपण उपक्रम रविवारी पार पडले. रस्त्याच्या दुतर्फा वड,पिंपळ, उंबर, कडुलिंब व अन्य झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण उपक्रमाला कृषी अधिकारी महादेव करे, विवेकानंद रिसर्चचे सुशांत रूळेकर, पर्यावरण प्रेमी राजेंद्र जाधव, सिटी ऑफ फ्लॉवसचे सुरेंद्र निंबाळकर, दीपक भगत, यांनी भेट दिली. यावेळी महादेव करे यांनी निसर्गाचे संतुलन राखण्याची वेळ आली आहे असे सांगत कृषी विभागामार्फत योजनांची माहिती करे यांनी दिले. विवेकानंद रिसर्चचे सुशांत रुळेकर यांनी झाडाच्या संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देत विविध योजनांसाठी प्रोत्साहन देणार असल्याचे रूळेकर यांनी सांगितले तर राजेंद्र जाधव यांनी वृक्षारोपण ही चळवळ बनवण्याची गरज आहे. तळाघर गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन वृक्षारोपण केले, हे खूपच कौतुकास्पद आहे असे जाधव यांनी सांगितले. ग्रामस्थ रुपेश शिंदे यांनी वृक्षारोपण ही ग्रामस्थांनी अनोखी चळवळ बनवली आहे इतर भागांसाठी हा प्रभावी संदेश आहे. झाड दत्तक घेऊन ही चळवळ यशस्वी करू अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली. बळीराजा फाऊडेंशनचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, मंगेश मोरे, सोनाजी कांबळे, संदेश मोरे, संतोष माने, यशवंत मोरे, रुपेश शिंदे, जयेश माने यांच्या कल्पकतेतून हा वृक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्यात आला. वृक्षारोपणातून उत्स्फूर्त सहभाग हा पर्यावरणासाठी पोषक ठरण्याची सार्वत्रिक भावना अधोरेखीत झाली आहे.
…